बांधकाम समिती सभेत सभापती महेंद्र चव्हाण यांचे आदेश
*⚡सिंधुदुर्गनगरी ता ०४-:* फोंडा प्राथमिक शाळा नंबर १ च्या एकुण २८ गुंठे जागेपैकी १४ गुंठे जागा निश्चित करण्यासाठी जागेची तात्काळ मोजणी करा. उर्वरित १४ गुंठे जागा मूळ मालकास परत करा. असे आदेश सभापती महेंद्र चव्हाण यांनी आज बांधकाम समिती सभेत दिले.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समितीचे सचिव दत्तराम सावंत, समिती सदस्य रेश्मा सावंत, मनस्वी घारे, संजय आंग्रे, जेरॉन फर्नांडिस, राजेश कविटकर, राजन मुळीक ,आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. कणकवली तालुक्यातील फोंडा प्राथमिक शाळा नंबर १ च्या परिसरात २८ गुंठे जागा आहे. त्यातील १४ गुंठे जागा जिल्हा परिषद मालकीची आहे.
तर १४ गुंठे जागा मूळ मालकाच्या नावावर आहे. या जमिनीचा एकत्रित सातबारा असून संबंधित जागेची मोजणी करून आपल्या मालकीची १४ गुंठे जागा निश्चित करावी, उर्वरित १४ गुंठे जागा मूळ जमीन मालकाला परत करावी. अशी सूचना सदस्य संजय आग्रे यांनी तीन महिन्यांपूर्वी सभेत केली होती. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने याबाबत संजय आंग्रे यांनी आजच्या सभेत नाराजी व्यक्त केली.
तर गेल्या तीन बैठकांना विषय मांडूनही याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाही. भविष्यात संबंधित मालकाने २८ गुंठे जागेपैकी काही गुंठे जागेत कंपाउंड केले तर शाळेत जाण्यासाठी रस्ताही मिळणार नाही. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.यावर सभापती महेंद्र चव्हाण यांनी फोंडा प्राथमिक शाळेच्या जमिनीची तात्काळ मोजणी करून १४ गुंठे जागा मूळ मालकाला परत करावी. असे आदेश शिक्षण विभागाला दिले. आजच्या बांधकाम समिती सभेत जिल्हा परिषद योजना सन २०२१-२२ च्या माहे नोव्हेंबर अखेर खर्चास मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद योजनांच्या एकूण ५ कोटी ९४ लाख ४३ हजार २०० रुपये मंजूर निधीपैकी आतापर्यंत २४ लाख ९५ हजार ५१७ रुपये निधी खर्च झाला आहे. तर ५ कोटी ६९ लाख ४७ हजार ६८३ रुपये निधी अद्यापही शिल्लक राहिला असल्याचा अहवाल आजच्या सभेत सादर करण्यात आला.
