वित्त समितीत संतोष साटविलकर यांचा आरोप
ओरोस-:जिल्हा परिषदेच्या शाळांची विजबिले भरण्यासाठी दिलेल्या निधीतून सादिलसाठी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप संतोष साटविलकर यांनी मंगळवारी वित्त समिती सभेत केला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद शाळांना वीज देयके भागविण्यासाठी ७४ लाख ८० हजार रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले होते. त्या निधीचा सादिल म्हणून शिक्षकांनी खर्च केला आहे, असेही यावेळी साटविलकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची तहकूब सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, सदस्य संतोष साटविलकर, जेरॉन फर्नांडिस, संजय देसाई, रवींद्र जठार, अनघा राणें आदी उपस्थित होते. यावेळी मागील सभेत सदस्य साटविलकर यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून शाळांची वीज बिल भरण्यासाठी तालुकानिहाय किती रक्कम दिली होती. त्यातील किती रक्कम खर्च करण्यात आली, याची माहिती पुढील सभेत देण्यात यावी, अशी मागणी केली होती.
त्यानुसार आजच्या सभेत तालुकानिहाय वितरित करण्यात आलेल्या अनुदानाची माहिती देण्यात आली. त्यात देवगड ११ लाख ४० हजार ५०० रुपये, वैभववाडी ५ लाख ३४ हजार रुपये, कणकवली १२ लाख ६ हजार १०० रुपये, मालवण ९ लाख ९५ हजार ३०० रुपये, कुडाळ १३ लाख ५ हजार ९०० रुपये, वेंगुर्ले ७ २१ हजार रुपये, सावंतवाडी ५ लाख ५० हजार ३०० रुपये, दोडामार्ग ४ लाख ७६ हजार ६०० रुपये असे एकूण ७४ लाख ८०० रुपये अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र यातील खर्चाचा तपशील देवगड, वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यांचा आला आहे. परंतु अद्याप कुडाळ व मालवण तालुक्यांचा तपशील आलेला नाही.
यावरून सदस्य साटविलकर यांनी नाराजी व्यक्त केली. ही माहिती देण्यास शिक्षण विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने सभागृहाने आक्षेप घेतला. त्यानंतर उपस्थित झालेल्या प्रतिनिधींना याबाबत काहीच माहिती नसल्याने शिक्षण विभागावर ताशेरे ओढण्यात आले. अखेर दोन दिवसांत सभापती यांना परिपूर्ण माहिती देण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले.
