माजी नगरसेवक सुरेश भोगटे : आठ दिवसांची दिली मुदत
*⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडीच्या वेशीवर कचरा डेपोच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाकडून त्यावर दुर्लक्ष केले जात आहे. सावंतवाडीत येणारे पर्यटक त्याच ठिकाणावरून सावंतवाडीत प्रवेश करता, परंतु, तरी देखील प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने, येत्या आठ दिवसांत यावर योग्य ती कारवाई न केल्यास तेथील स्थानिक ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी ते म्हणाले की, येथे पसरलेल्या दुर्गंधीमुळे या भागात राहणाऱ्या आजूबाजूच्या नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असून, अनेकजण आपल्या घरातील कचरा त्या ठिकाणी आणून चुकीच्या पद्धतीने टाकत असल्याने हा त्रास होत आहे. यावर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी माजी सभापती प्रमोद सावंत, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सुधीर पराडकर सुरेश गावडे,नितेश माडगुत आदी यावेळी उपस्थित होते.
