मुंबई एकता कल्चरची पारितोषिके प्रा.वैभव साटम, कवयित्री प्रमिता तांबे यांना जाहीर

कणकवली 31 डिसेंबर (प्रतिनिधी)- मुंबई एकता कल्चरचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून आयनल येथील कथालेखक प्रा वैभव साटम यांना कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर झाला आहे. तर या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत कलमठ येथील कवयित्री प्रमिता तांबे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.8 जानेवारी रोजी गिरगांव साहित्य संघात अभिनेते अनिल गवस,कवी अजय कांडर,हिंदी साहित्यिक रमेश यादव यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात प्रा.साटम आणि श्रीमती तांबे यांना पारितोषिक देऊन गैरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली.

दरम्यान मुंबई एकता कल्चरच्या वार्षिक पारितोषिकांमध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना जीवन गौरव पुरस्काराने तर इतर पारितोषिकांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रज्ञा जाधव, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक इक्बाल मुकादम, संगीतक्षेत्रातील मनोज आचार्य, पत्रकार प्रसाद जोशी, शैक्षणिक क्षेत्रातील विद्या प्रभू, नृत्यांगना कादंबरी वाझे यांचाही गौरव करण्यात येणार आहे. प्रा.साटम हे गेली पंधरा वर्षे निष्ठेने साहित्य लेखन करत असून कथा-ललित/कविता/समीक्षा आणि कादंबरी आदी साहित्यप्रकारात ते सातत्याने लिहीत असतात.त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांना यापूर्वी महाराष्ट्रातील मान्यवर संस्थेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर अ. भा. साहित्य संमेलनाबरोबरच मान्यवर संस्थेच्या कविसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सध्या ते समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गचे विश्वस्त म्हणून साहित्य चळवळीत कार्यरत आहेत. तर श्रीमती तांबे या शिक्षिका असून कवयित्री म्हणूनही त्यांनी आपली गुणवत्ता अल्पावधीत सिद्ध केली आहे. अस्वादात्मक समीक्षा लेखनही त्या करत असतात.त्या सध्या समाज साहित्य संघटनेच्या कोष्यध्यक्ष म्हणून सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीत कार्यरत आहेत. प्रा. साटम, श्रीमती तांबे यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गाच्या साहित्य चळवळीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page