कुलगुरु डॉ.संजय सावंत यांचे कुणकेरी येथे शेतक-यांना आवाहन
*⚡वेंगुर्ला ता.३१-:* सध्यस्थितीत मागील तीन वर्षांपासून कोकणात पावसाचे प्रमाण वाढले असून वेगवेगळ्या प्रकारच्या वादळांच्या संख्येत वाढ झाली आहे. या बदलत्या वातावरणाचा विचार करुन केरळमध्ये येणारी फळपिके ड्युरियन, रानबुतान, लोगान, मॅगोस्टीन इत्यादी पिकांच्या लागवडीचा शुभारंभ वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या परिसरात तर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठामार्फत कुणकेरी गावात लोक सहभागातून समुह पद्धतीने सुरु होणा-या मिरची लागवडीचा शुभारंभ कुलगुरु डॉ.संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. कुलगुरु डॉ.सावंत यांनी केरळमधील ही पिके अति पर्जन्यमानात सुद्धा चांगल्या प्रकारे येतात. त्यामुळे या फळपिकांच्या आंब्यामध्ये आंतरपिक म्हणून अभ्यास या वेंगुर्ला संशोधन केंद्रावर करण्यात येत असल्याची माहिती वेंगुर्ला येथे तर शास्त्रीय दृष्टीकोनातून मिरी लागवड करुन शेतक-यांनी आपला सामाजिक व आर्थिक स्तर उंचवावा असे आवाहन कुणकेरी येथे केले.
दरम्यान, स्थानिक पपईमध्ये औषधी गुणधर्म असणारे घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याकरीता स्थानिक पपईचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीकोनातून कोकण कृषी विद्यापिठ दापोली, लुपिन फाऊंडेशन सिधुदुर्ग आणि कृषी विभाग सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने समुह पद्धतीने पपई लागवड या विषयावर मळगांव येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात कुलगुरु डॉ. संजय सावंत यांनी मार्गदर्शन केले. डॉ.सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ.पराग हळदणकर यांनी पपई पिकांची शास्त्रीय पद्धतीने लागवड व त्यांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. तर ल्युपिन फाऊंडेशनचे योगेश प्रभू यांनी प्रकल्पाची माहिती दिली. कुलगुरु डॉ.सावंत यांच्या हस्ते मळगांवमधील शेतक-यांना स्थानिक जातीच्या पपई रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन.सावंत, डॉ.गजभिये, डॉ.एम.एस.गवाणकर, डॉ.दळवी, डॉ.सणस आदी शास्त्रज्ञ उपस्थित होते. फोटोओळी – कुणकेरी येथे कुलगुरु डॉ.संजय सावंत मिरी लागवडीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले.
