सावंतवाडीत २९ जानेवारीला रंगणार विभागीय कवयित्री संमेलन

*⚡सावंतवाडी ता.३१-: येथील आरती मासिक, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे प्रतिवर्षी आयोजित केले जाणारे निमंत्रितांचे १६ वे विभागीय कवयित्री संमेलन शनिवार २९ जानेवारी रोजी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या कवयित्री संमेलनातून महाराष्ट्र, गोवा, बेळगाव येथील विविध भागांतून सुमारे शंभरपेक्षा अधिक कवयित्रींनी सहभाग घेऊन रसिकांची दाद मिळविली आहे. अरुणा ढेरे, नीरजा, प्रज्ञा पवार, सुनंदा भोसेकर, नीलम माणगावे अशा नामांकित कवयित्रींनी या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे.

१६ व्या कवयित्री संमेलनाचे अध्यक्षस्थान पुण्याच्या ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक अंजली कुलकर्णी भूषविणार आहेत. अंजली कुलकर्णी मराठी साहित्याच्या एम. ए. असून त्यांनी एलएलबी पदवीही संपादन केली आहे. स्त्रीवादी कवयित्री-लेखिका म्हणून त्या महाराष्ट्रात परिचित आहेत. त्यांची एकूण १७ पुस्तके आणि चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी व नेपाळी भाषेत भाषांतरित झाल्या असून ‘बदलत गेलेली सही’ हा काव्यसंग्रह पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात निवडला गेला आहे. विविध संस्थांच्या प्रतिष्ठित अशा सुमारे पंचवीस राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन रत्नागिरी येथील कवयित्री नमिता कीर यांच्या हस्ते होणार आहे. त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. मराठी भाषा राज्य नियामक मंडळाच्या त्या सदस्य असून गेली पंचवीस वर्षे ‘रत्नागिरी एक्सप्रेस’ या दिवाळी अंकाच्या संपादकपदी कार्यरत आहेत. त्यांनी अनेक पुस्तके संपादित केली आहेत. अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.

संमेलनात दिपाली किन्हाळकर (नांदेड), उर्मिला चाकूरकर (औरंगाबाद), प्रा. दीपा ठाणेकर (ठाणे), अनुराधा म्हापणकर (मुंबई), नीता तोरण (गोवा), प्रा. अदिती बर्वे यांच्यासह सिंधुदुर्गातील नामांकित नवोदित कवयित्री आपल्या कविता सादर करणार आहेत. साहित्य क्षेत्रातील नव्या लिहित्या हातांचा शोध घेत असतानाच महिलांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून गेली सोळा वर्षे आयोजक संस्थांच्या सहकार्याने आणि ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांच्या पुढाकाराने आयोजित केल्या जाणाऱ्या या संमेलनाची दखल आता महाराष्ट्रभर घेतली जात आहे. या संमेलनात महाराष्ट्र आणि गोवा येथील कवयित्रींच्या दर्जेदार कवितांचा आस्वाद सावंतवाडीकरांना चाखता येणार आहे. साहित्यरसिकांनी या कवयित्री संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरती मासिक, कोमसाप शाखा सावंतवाडी व श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page