दिरंगाई करणा-या अधिका-यांच्या बदली प्रकरणातील सभापतींच्या ‘त्या‘ मतावर आक्षेप

वेंगुर्ला प्रतिनिधी– पंचायत समिती १५ वा वित्त आयोगाच्या कामांमध्ये सातत्याने दिरंगाई होत असल्याने संबंधित अधिका-याची बदली करण्यात यावी असा ठराव मांडण्यात आला होता. मात्र, या ठरावामध्ये संबंधित कामाशी निगडित असणा-या पंचायत समितीमधील सर्व अधिका-यांची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी असे मत सभापती अनुश्री कांबळी यांनी या ठरावात घुसडल्याने हे सभापतींचे वैयक्तिक मत असून यावर आक्षेप घेत सदस्यांनी मांडलेल्या ठरवातून ते वगळण्यात यावे अशी भूमिका पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर व स्मिता दामले यांनी घेतल्याने सभापतीचे मत या ठरवातून वगळण्याचा ठराव आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा आज शिरोडा येथील अ.वि.बावडेकर हायस्कुलच्या सभागृहात उपसभापती सिद्धेश परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंचायत समिती सदस्य यशवंत परब, सुनील मोरजकर, श्यामसुंदर पेडणेकर, स्मिता दामले, प्रणाली बंगे, गटविकास अधिकारी उमा पाटील-घारगे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. १० पेक्षा जास्त पटसंख्या असणा-या शाळांना २ शिक्षक मंजूर असतात मात्र त्यापेक्षा कमी पटसंख्या असणाया शाळेच्या शिक्षकाचे समायोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात येते. याबाबतची माहिती शाळा व्यवस्थापन समिती व तेथील लोकप्रतिनिधी, सरपंच यांना देण्यात आली तर ते शिक्षकाची बदली होऊ नये म्हणून पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील. त्यामुळे जर कोणत्याही गावातील शिक्षकांचे समायोजन करावयाचे असल्यास तेथील शाळा व्यवस्थापन समिती व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना शिक्षण विभागाने कळवावे असा ठराव सदस्य यशवंत परब यांनी मांडला. तालुका कृषी विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेल्या विविध योजनांच्या उभारणीसाठी लाभार्थी कर्ज घेतात व त्यानंतर त्यांचे पैसे कृषी विभागाकडून देण्यात येतात. परंतु, कृषी विभागाकडुन मंजुरी देण्यात आलेल्या योजनांसाठी लाभार्थ्यांनी कर्जपुरवठा घेऊन आंबा पॅक हाऊस उभारले आहे. मात्र, अद्याप त्यांना कृषी विभागाकडून योजनेचा लाभ मिळाला नसून कर्जाचा नाहक भुर्दंड शेतक-यांना बसत आहे. यावर तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड यांनी सदरची योजना गेली २ वर्षे बंद असल्याने या योजनेतील शेतक-यांना लाभ देता आला नाही. मात्र आता ही योजना सुरू झाली असून मंजुरी घेतलेल्या लाभार्थ्यांनी कृषी विभागाशी संफ साधावा असे आवाहन केले.

वेंगुर्ला तालुक्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला असताना या भागातील मच्छिमार स्थानिक रहिवासी यांचे विविध प्रश्न असताना मत्स्य विभाग, खारलँड व पत्तनचे अधिकारी वारंवार पंचायत समिती सभांना गैरहजर राहतात यावर प्रशासनाचा वचक नसल्याने या संबंधी प्रश्न आम्ही कोणाला विचारणार? असा सवाल सदस्य यशवंत परब व सुनील मोरजकर यांनी सभेत उपस्थित केला तसेच संबंधित अधिका-यांना याबाबत नोटिसा पाठवण्यात याव्यात असे सांगितले यावर गटविकास अधिकारी पाटील यांनी संबंधित अधिका-यांच्या वरिष्ठांना याबाबत पत्र पाठविणार असल्याचे संगितले.

या सभेत पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या जागेत अतिक्रमणाचा धोका असल्याने त्या जागेची मोजणी करून कंपाऊंड वॉलसाठी निधीची मागणी करण्याचे ठरवण्यात आले. तसेच सदस्य सुनील मोरजकर यांनी यावर्षीच्या बंधारा साप्ताह बाबत काय नियोजन केले असा प्रश्न उपस्थित केला असता याबाबत अध्याप नियोजन नसल्याचे संबंधित अधिका-यांनी सांगितले. सभापती यांनी संबंधित अधिका-यांच्या बैठका घेऊन याबाबत नियोजन करणे आवश्यक होते तसे न झाल्यास गावागावात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे असे मत मांडले. पंचायत समिती मार्फत उत्कृष्ट कर्मचारी, अधिकारी, पत्रकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी सूचना उपसभापती सिद्धेश परब यांनी केली. यावर अधिकारी व कर्मचारी आपले काम चोख पार पाडतात त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे असे सांगत सर्वानुमते ठरव घेण्यात आला.

You cannot copy content of this page