मालवण:- (प्रतिनिधी) देवबाग ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन च्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार अपर्णा अरविंद धुरी यांनी १८१ मते मिळवत शिवसेना पुरस्कृत उमेदवार रमेश पांडुरंग कद्रेकर (१६२ मते) यांचा पराभव केला. तर यापूर्वी प्रभाग एक च्या निवडणुकीत भाजपचे नितीन बांदेकर हे बिनविरोध निवडून आले होते. शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या देवबाग ग्रामपंचायतीमध्ये हा विजय भाजपसाठी महत्वाचा मानला जात आहे.
मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये केवळ देवबाग ग्रामपंचायत मधील प्रभाग तीन च्या रिक्त जागेसाठी काल सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडून ५४.७७ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी आज मालवण तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. यात भाजप पुरस्कृत अपर्णा धुरी यांना १८१ मते, शिवसेना पुरस्कृत रमेश कद्रेकर यांना १६२ मते मिळाली, तर ७ मते ही नोटा होती. यामुळे भाजपच्या अपर्णा धुरी या १९ मतांच्या आघाडीने विजयी झाल्या. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आनंद साजरा केला. अपर्णा धुरी यांच्या विजयामुळे उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आनंद साजरा करत धुरी यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सचिव महेश मांजरेकर, अविनाश सामंत, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, सौ. श्वेतांगी मणचेकर, रामा चोपडेकर, विलास बिलये, नादार तुळसकर, नितीन बांदेकर, मोहन कुबल, दाजी कांदळगावकर, तात्या बिलये, जॅक्सन रॉड्रीक्स, विजय केळुसकर, मुकेश कांदळगावकर, सहदेव साळगावकर, नंदू कुपकर, पंकज मालंडकर, दत्ता चोपडेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रभाग तीन च्या रिक्त जागेवर भाजपच्या अपर्णा धुरी या निवडून आल्याने शिवसेनेला व मुख्यत्वे करून देवबाग मध्ये वर्चस्व असलेले शिवसेना तालुकाप्रमुख व या भागाचे जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
