आझाद मैदानावरील 22 डिसेंबर रोजी आंदोलन;शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष नितीन कदम
*⚡ओरोस ता.२१-:* आंतरजिल्हाबदलीसाठी 10 टक्के मनुष्यबळाची अटीमुळे कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या नाहक अडकून पडलेल्या आहेत ही 10 टक्केची अट रद्द करावी व आंतरजिल्हाबदलीबाबत विविध अडचणी तात्काळ दूर कराव्यात या मागणीसाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाच्या आझाद मैदान मुंबई येथील 22 डिसेंबर च्या धरणे आंदोलनास शिक्षक समिती सिंधुदुर्ग चा जाहिर सक्रीय पाठिंबा असल्याचे निवेदन मान नाम हसन मुश्रीफ ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात विविध जिल्हयात कार्यरत शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शेकडो किलोमीटर दूरवर असलेले पती पत्नी, दिव्यांग शिक्षक, इतर शिक्षक आंतरजिल्हाबदलीसाठी इच्छुक असताना शासनाकडून याबाबत निष्कारण दिरंगाई होत आहे. ग्रामविकास विभागाने 7 एप्रिल 2021 रोजी आंतरजिल्हाबदलीचे नवीन धोरण जाहीर केले पण अद्याप एकदाही बदल्या झाल्या नाहीत.
तसेच ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना एकूण रिक्तपदे 10 टक्के पेक्षा जास्त असतील तर कार्यमुक्त करू नये या अटीमुळे कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 84 आंतरजिल्हाबदली शिक्षक सन 2017 पासून कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये आंतरजिल्हा बदली टप्पा क्र 1 मध्ये 17 शिक्षक, टप्पा क्र 3 मधील 63 शिक्षक, टप्पा क्र 4 मधील 4 शिक्षकांचा समावेश आहे. 10 टक्केची अट रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यातील खाजगी शिक्षकांचे समायोजन, आगामी नोकर भरती विचारात घेता आंतरजिल्हाबदली प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आंतरजिल्हाबदली प्रक्रिया लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. यासाठी आंतरजिल्हाबदलीचे ऑनलाईन पोर्टल लवकरात लवकर तयार करून आंतरजिल्हाबदली प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सुरू करण्या अगोदर ऑनलाईन पोर्टलवर जिल्हानिहाय व प्रवर्ग निहाय रिक्तपदांचे अहवाल प्रसिद्ध करावेत, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अंतिम बदलीपात्र याद्या तयार करण्यापूर्वी प्रवर्ग निहाय प्रतिक्षा याद्या आक्षेपासाठी प्रसिद्ध कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी 22 डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाच्या धरणे आंदोलनास प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग ने जाहिर सक्रीय पाठिंबा असलेबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेलद्वारे पाठविले आहे.
