जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय टास्क फोर्स बैठकीत आढावा;२७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन..

⚡सिंधुदुर्ग, दि.२२-: जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ योग्य प्रकारे व्हावी आणि जंतसंसर्गापासून संरक्षण मिळावे, यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ५४८ पात्र लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली २२ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली.
या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गनगरीचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रतीक उगारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सतीश गुजलवार आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे उपस्थित होते. बैठकीत मोहिमेचे नियोजन, विविध विभागांमधील समन्वय आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत जंतनाशक गोळ्या पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या मोहिमेत अंगणवाडी केंद्रांतील बालके, शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच शाळाबाह्य बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. मोहिमेंतर्गत अल्बेंडाझोल ४०० मि.ग्रॅ. या जंतनाशक औषधाचा वापर करण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना अर्धी गोळी (२०० मि.ग्रॅ.), २ ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना एक पूर्ण गोळी बारीक करून पाण्यात विरघळवून, तर ३ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एक पूर्ण गोळी चावून देण्यात येणार आहे. औषध देताना निर्धारित मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिनी गोळ्या घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र बालकांना जंतनाशक औषधाचा लाभ मिळावा, यासाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि शिक्षक यांच्या सहकार्याने पात्र लाभार्थ्यांपर्यंत औषध पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जंतसंसर्गामुळे बालकांच्या पोषणावर, शारीरिक वाढीवर आणि एकाग्रतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा लाभ मिळेल, याची खात्री करावी. तसेच शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयातून सक्रिय सहभाग नोंदवून जिल्ह्यातील कोणतेही पात्र बालक मोहिमेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
००००००
