Headlines

आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह…

घरोघरी सर्वेक्षणातून ३९ संभाव्य लाभार्थ्यांचा शोध; दोघांना वॉकर व श्रवणयंत्राचे वाटप..

⚡सिंधुदुर्ग, दि.-: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा), सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत न्यायसेवा, कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी दि. २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या मेगा ड्राईव्हअंतर्गत आंब्रड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेदरम्यान विधी स्वयंसेवकांनी घरोघरी भेटी देऊन १३ विविध योजनांच्या संभाव्य लाभार्थ्यांचा शोध घेतला. एकूण ३९ संभाव्य लाभार्थी आढळून आले असून, त्यापैकी दोन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात एक वॉकर व एका श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत २२ ऑक्टोबर रोजी श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड येथे विशेष महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक मार्गदर्शन व जनजागृती करण्यासोबतच आयुष्मान कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश एन. ए. बकरे, कुडाळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. जी. टी. पडते, अॅड. आर. डी. बिले, अॅड. आर. पी. नाईक, अॅड. व्ही. बी. मांडकुलकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रत्युष बिस्वाल, डॉ. सुशांता कुलकर्णी, अपंग पुनर्वसन केंद्राचे अनिल शिंगाडे, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
१३ शासकीय योजनांची माहिती; ३९ संभाव्य लाभार्थ्यांचा शोध
मेगा ड्राईव्हअंतर्गत आंब्रड गावात विधी स्वयंसेवकांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांना विविध १३ शासकीय योजनांची माहिती दिली. या सर्वेक्षणातून ३९ संभाव्य लाभार्थी आढळून आले. त्यांच्या गरजांनुसार आवश्यक अर्ज भरून घेण्यात आले असून, संबंधित कार्यालयांशी चर्चा व समन्वय साधून पुढील कार्यवाहीसाठी अर्ज पाठविण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावाही करण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने अपंग पुनर्वसन केंद्र, ओरोस यांच्यामार्फत दोन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात एक वॉकर व एक श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळण्यास आणि आवश्यक सेवांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
कायदेविषयक व आरोग्यविषयक मार्गदर्शन
शिबिरात मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, मुलांची मानसिकता व मानसिक बदल, मध्यस्थी प्रक्रिया (मेडिएशन), रागावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व तसेच फेसबुक व इन्स्टाग्रामच्या आकर्षणामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
अॅड. आर. पी. नाईक यांनी मोबाईलच्या दुष्परिणामांविषयी, अॅड. आर. डी. बिले यांनी मुलांची मानसिकता, मानसिक बदल व मध्यस्थी प्रक्रियेविषयी, डॉ. सुशांता कुलकर्णी यांनी रागावर नियंत्रण ठेवण्याविषयी, तर अॅड. व्ही. बी. मांडकुलकर यांनी फेसबुक व इन्स्टाग्रामच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. तृप्ती वालावलकर यांनी केले. प्रास्ताविक जी. ए. कुलकर्णी यांनी केले, तर आभार कुडाळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. जी. टी. पडते यांनी मानले.
000000

You cannot copy content of this page