पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक नागरिकांचाही सहभाग..

⚡कुडाळ ता.२२-: कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने नगरसेवक मंदार शिरसाट, लायन्स क्लब कुडाळ आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त पुढाकारातून बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले.
या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास मदत होणार असून, परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यास हातभार लागणार आहे. परिणामी, आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या पूर्ततेप्रसंगी नगरसेवक मंदार शिरसाट, श्री. राणे, श्री. ताम्हणकर, सुलभा देसाई, श्री. आरोलकर, श्री. चऱ्हाटकर, किरण वारंग, मनोज जंगम, श्री. साळवी, श्री. तेंडुलकर यांच्यासह विठ्ठलवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक मंदार शिरसाट यांनी विठ्ठलवाडीतील पाण्याचा प्रश्न सोडविणे ही प्राथमिकता असल्याचे सांगितले. लायन्स क्लब कुडाळ आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे बंधाऱ्याचे काम पूर्ण करता आल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पाणी संवर्धनासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न परिसरासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
