खोट्या तक्रारींमुळे व्यवसाय सील केल्याचा प्रकार:सायबर फसवणुकीच्या प्रकाराची पालकमंत्री नितेश राणेंकडून दखल..

⚡कुडाळ ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नावाने फोन करून धमकावणे, परवान्यांच्या चौकशीचा बहाणा करत पैशांची मागणी करणे आणि ऑनलाइन पोर्टलवर खोट्या तक्रारी दाखल करण्याचा प्रकार समोर आला आहे. या तक्रारींच्या आधारे चार ते पाच हॉटेल व्यावसायिकांचे व्यवसाय सील करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकारामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या परवान्यांची माहिती घेण्याच्या बहाण्याने काही व्यक्ती विविध तालुक्यांतील हॉटेल चालकांना फोन करत आहेत. हॉटेलकडे आवश्यक परवाना नसल्याचे समजल्यास क्यूआर कोड पाठवून त्याद्वारे पैसे भरण्यास सांगितले जाते. पैसे न दिल्यास हॉटेल चार महिन्यांसाठी सील करण्याची धमकी दिली जात असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. संदीप शिंदे आणि फर्नांडिस या नावांचा वापर करून फोन केले जात असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक राजन नाईक यांनी दिली.
ऑनलाइन पोर्टलचा गैरवापर करून खोट्या तक्रारी
हॉटेलची माहिती ऑनलाइन उपलब्ध असल्याचा गैरफायदा घेत संबंधित व्यक्ती एफडीएच्या ऑनलाइन पोर्टलवर हॉटेलांविरोधात खोट्या तक्रारी दाखल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रार नोंदवताना संबंधित हॉटेलमध्ये जेवण केल्याचा पुरावा किंवा बिल जोडण्याची सक्ती नसल्याने या सुविधेचा गैरवापर होत असल्याचा दावा व्यावसायिकांकडून करण्यात आला आहे. या तक्रारींमुळे चार ते पाच हॉटेल व्यावसायिकांचे व्यवसाय सील झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक व्यवसाय बंद पडल्याने संबंधित चालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
एफडीएचा खुलासा; अज्ञात फोन कॉलला घाबरू नका
या प्रकरणी सिंधुदुर्ग अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांशी चर्चा केली असता, संदीप शिंदे किंवा फर्नांडिस नावाचे कोणतेही कर्मचारी विभागात कार्यरत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अशा फोन कॉल्सना घाबरू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या अधिकृत तपासणीवेळी अधिकाऱ्यांनी आपली ओळख आणि अधिकृत कागदपत्रे सादर करणे अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले.
पालकमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश
सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक यांनी व्यावसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. खोट्या तक्रारींमुळे होणाऱ्या कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी हॉटेल संघटना लवकरच अन्न व औषध प्रशासनाची भेट घेणार आहे.
या प्रकरणाची पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेत पोलीस यंत्रणेला तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल संघटनेकडूनही लवकरच पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी परवान्यांच्या नावाखाली पैशांची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तींना पैसे देऊ नयेत. अशा प्रकारची धमकी मिळाल्यास संबंधित व्यक्तीची अधिकृत यंत्रणेकडून खातरजमा करून जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन राजन नाईक यांनी केले आहे.
