⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी शहरातील जिल्हा कारागृहाशेजारी असलेल्या ऐतिहासिक ‘समता प्रेरणा भूमी’ या वास्तूला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाची पवित्र स्मृती लाभली आहे. २२ ऑक्टोबर १९३२ रोजी एका खटल्याच्या निमित्ताने सावंतवाडीत आल्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची या प्रेरणाभूमीच्या ठिकाणी उपस्थिती लाभली होती. हीच ऐतिहासिक भूमी अधिक पवित्र मानत, आगामी २५ ऑक्टोबर रोजी येथे आंबेडकर अनुयायांतर्फे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा समाजकल्याण सभापती ॲड. अनिल निरवडेकर यांनी स्वतः पुढाकार घेत समता प्रेरणा भूमी परिसराची स्वच्छता आणि बंद अवस्थेत असलेल्या कारंज्याची डागडुजी करून हा संपूर्ण परिसर चकाचक केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदर आणि अपार प्रेम भावना व्यक्त करत ॲड. अनिल निरवडेकर यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या मोहिमेचे नेतृत्व केले. कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि या पवित्र वास्तूचे पावित्र्य व सौंदर्य कायम राहावे, यासाठी त्यांनी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण परिसराची स्वच्छता करून घेतली. तसेच बऱ्याच दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले कारंजेही पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि ॲड. निरवडेकर यांच्या या विशेष प्रयत्नांमुळे ‘समता प्रेरणा भूमी’चा संपूर्ण परिसर आता लकाकला असून, २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी हा परिसर पूर्णपणे सज्ज झाला आहे. उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या विशेष लक्ष दिल्याने सर्व स्तरांतून कौतुक होत असून, आंबेडकर अनुयायांनीही याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

