प्राथमिक शिक्षक संघाचे तहसीलदारांना निवेदन
*⚡सावंतवाडी ता.२१-:* जुनी पेन्शन योजना लागू करून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी सावंतवाडीच्या नायब तहसीलदारांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई, तालुकाध्यक्ष संजय शेंडगे, सरचिटणीस अमोल पाटील, सहसचिव निंगोजी कोकितकर, माजी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मृगाली पालव, सीमा पंडित, राधिका परब आदी उपस्थित होते. कोरोना कालावधीत प्राथमिक शिक्षकांनी कोरोना योद्धे म्हणून विविध स्तरावर उत्तम कार्य केले आहे. त्याचबरोबर कोविड सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली आहे. परंतु शासन व प्रशासन शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत अत्यंत उदासीन आहे.
प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षणसेवक पद्धती बंद करून नियमित शिक्षकाची नेमणूक करावी. तसेच कार्यरत शिक्षण सेवकांचे मानधन वाढविणे, नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून खंड दोन प्रकाशित करण्यात यावा, जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, शिक्षकांना दहा, वीस, तीस वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी, संगणक परीक्षा उत्तीर्णतेला मुदतवाढ देऊन वसुली थांबविण्यात यावी, पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्यात यावी, शिक्षकांना रजा रोखीकरण याचा लाभ मिळावा, अप्रशिक्षित शिक्षकांच्या शिक्षणसेवक पदावर व्यतीत केलेला कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. संघटनेचे संदिप निऊंगरे, गोपाळ साबळे, विवेक कुलकर्णी, शिवाजी कवडे, चाँद मुंजेवार, पांडूरंग होंडे, मालू लांबर, रमेश शिंदे, मंगेश देसाई, भूषण पाटील, सागर पाटील, बाबणी ठाकूर, सदानंद कुंभार, उमेश चव्हाण, अमोल सासवडे, पांडूरंग पाटील, उमेश मुरकुटे, श्री.वेठेकर, उमेश लोणकर, स्वप्निल नवखरे, आत्माराम जळवी आदीसह डीसीपीएसधारक शिक्षक उपस्थित होते.
