समीर वायंगणकर द्वितीय तर भूषण मेतर तृतीय

⚡मालवण ता.२२-:
मालवण नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी सजावट स्पर्धा- २०२६ मध्ये गौरेश शरद कांबळी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर समीर सुभाष वायंगणकर यांनी द्वितीय क्रमांक व भूषण राजन मेतर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मालवण नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पुनर्वापराला प्रोत्साहन देणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उद्योजक तथा शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, मंदार केणी, महेश कांदळगावकर, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, माजी नगरसेवक जॉन नरोना, अधिकारी, कर्मचारी, स्पर्धक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत यश श्रीकृष्ण तारी व पार्थ प्रसाद वाडकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र, धनादेश व कापडी पिशवी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर प्रफुल्ल वसंत देसाई, अमित धाकु खोत, विजय चंद्रकांत अटक, अनिता अनिल केळुसकर, मधुकर दिगंबर चव्हाण, श्रीप्रसाद दयानंद सकपाळ यांना सहभाग प्रमाणपत्र व कापडी पिशवी देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या मूल्यमापन प्रक्रियेत योगदान दिल्याबद्दल परीक्षक स्वाती भालचंद्र पारकर आणि पार्थ साईनाथ मेस्त्री यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व कापडी पिशवी देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना नगरध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेश सजावट करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, या हेतूने नगरपरिषदेमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला असे सांगत नागरिकांनी नगरपालिकेच्या सर्व उपक्रमात सहभागी होऊन प्लास्टिक मुक्त मालवण शहर बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी गणेशोत्सवातील सजावट ही अधिकाधिक पर्यावरण पूरक व्हावी यासाठी पुढील वर्षीही स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने घेण्यात येईल, असे सांगितले.
आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी या स्पर्धेत स्पर्धकांनी घेतलेला सहभाग महत्वाचा होता, प्लास्टिक मुक्त शहरासाठी नागरिक, प्रशासन व लोकप्रतिनिधी असे सर्वांनी मिळून काम करूया असे सांगितले. यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनीही मालवण शहरातील गणेशोत्सव हा संपूर्ण जिल्ह्यात पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणारा आदर्शवत उत्सव ठरावा असे काम करूया, असे सांगितले. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा शपथ’ घेत पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि हरित पर्यावरण जपण्याचा संकल्प केला.
