जिल्हा न्यायालयाचा निकाल; कॅथॉलिक अर्बनच्या सोसायटीला दिलासा…
⚡सावंतवाडी , ता. २२-: धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवत अतिरिक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश क्रमांक २, श्री. इंदुलकर यांनी आरोपीचे अपील फेटाळून लावले. कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने दाखल केलेल्या धनादेश अनादर प्रकरणात हा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच देण्यात आला.
कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शिरोडा शाखेतून संतोष लुडबे यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी त्यांनी १ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, हा धनादेश अनादरित झाल्याने सोसायटीने चलनक्षम दस्तऐवज अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये वेंगुर्ला न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने संतोष लुडबे यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच १ लाख ३८ हजार ५०० रुपये ३० दिवसांच्या आत अदा करण्याचे आदेश दिले होते. रक्कम न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास, तसेच ५ हजार रुपये दंड भरण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार होता. या निर्णयाविरोधात आरोपीने अतिरिक्त प्रधान जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणीदरम्यान फिर्यादी सोसायटीच्या वतीने कर्जविषयक नोंदी, कर्जदाराने भरलेल्या रकमेचा हिशोब, व्याजासंदर्भातील कायदेशीर तरतुदी तसेच कर्जखात्यातील प्रत्यक्ष देय रकमेचा तपशील न्यायालयासमोर सादर करण्यात आला. या सर्व बाबींचा विचार करून अतिरिक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. इंदुलकर यांनी आरोपीचे अपील फेटाळून कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या प्रकरणात सोसायटीतर्फे अॅड. अमोल मालवणकर आणि सुरेंद्र तेली यांनी काम पाहिले.”

