वेंगुर्ला नगराध्यक्ष चषक बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी;बाळकृष्ण पेडणेकर ठरला विजेता
*⚡वेंगुर्ले ता.२१-:* वेंगुर्ला नगरपालिकेने स्वच्छता अभियानांतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा सतरा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ६२ खेळाडू सहभागी झाले होते. मुक्ताई अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. अॅकेडमीच्या चार विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवत जिल्ह्यात आपला दबदबा कायम ठेवला. खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर याने निर्विवादपणे सहा फेऱ्यांमध्ये सहा पाॅईंट्स मिळवत विजय साजरा केला. चौदा वर्षांखालील गटात मुक्ताई अॅकेडमीच्या आयुष राठोड याने प्रथम, भावेश कुडतरकर याने दुसरा आणि विभव राऊळ याने तिसरा क्रमांक मिळविला.
सावंतवाडीत घेण्यात आलेल्या एकोणीस वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतही सर्व गटात मुक्ताई अॅकेडमीच्या विदयार्थ्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी बाळकृष्ण पेडणेकरसह भावेश कुडतरकरने दुसरा आणि आयुष राठोडने चौथा क्रमांक मिळवला. इतर गटात ११ वर्षे मुले प्रथम वरद कामत, १३ वर्षे मुली द्वितीय भुमि कामत, तृतीय सौम्या हरमलकर, १५ वर्षे मुले-प्रथम राजेश विरनोडकर, तृतीय- स्वानंद जोशी, १९ वर्षे मुली प्रथम-पल्लवी निरावडेकर, १९वर्षे मुले प्रथम-मनिष निरावडेकर या मुक्ताई अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवली. राणीसाहेब शुभदादेवी भोंसले आणि युवराज लखमराजे भोंसले यांनी अॅकेडमीच्या विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विदयार्थ्यांना आणि अॅकेडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
