मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी देवीच्या पालखीसह ग्रामस्थांच्या भेटीला…

गावात चैतन्याचे व भक्तीचे वातावरण;तरंगकाठीचे व पालखीचे ग्रामस्थांकडून विधीवत पूजन

*💫सावंतवाडी : सहदेव राऊळ-:* मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी देवीच्या पालखीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे गावात चैतन्याचे व भक्तीचे वातावरण असून घरी आलेल्या तरंगकाठीचे व पालखीचे प्रत्येक घरोघरी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत व भक्तिभावाने पूजन करण्यात येत आहे.

मळगाव-सोनुर्ली देवस्थानचा सोनुर्ली माऊली जत्रोत्सब पार पडल्यानंतर मळगाव गावात पंचायतन देवस्थानची तरंगकाठी घरोघरी फिरविण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षापासून चालत आली आहे. तत्पूर्वी ही तरंगकाठी सोनुर्ली जत्रोत्सवासाठी नेली जाते. मळगाव व सोनुर्ली देवस्थान एक असल्याने तरंगकाठी व पालखी जत्रोत्सवानंतर सोनुर्ली येथे पाहुणचारासाठी थांबते. या दरम्यान सोनुर्ली गावातही ही तरंगकाठी घरोघरी फिरविली जाते. सोनुर्ली गावात तरंगकाठी फिरविल्यावर पुन्हा मळगाव गावात आल्यावर तरंगकाठी मळगावात घरोघरी फिरविली जाते. यावेळी गावातील गोसावी मठालाही भेट देण्यात येते. यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कुळघराकडून विधिवत तरंगकाठी व पालखीचे पूजन झाल्यावर ढोलांच्या गजरात मानकऱ्यांच्या उपस्थितीत गावचे मानकरी सावंत यांच्या घरापासून तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पाडगावकर, जोशी आदी मानकऱ्यांजवळ तरंगकाठी फिरवून बाकी गावात तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी घरातील व्यक्तींनी तरंगकाठीचे विधीवत पूजन केले. तसेच देवीची ओटी भरण्यात आली. यावेळी सुवासिनींनी तसेच नवीन लग्न झालेल्या महिलांनी देवीस साडी अर्पण करुन नवसफेड केली. या सोहळ्यात मोठ्यांसह लहान मुलेही सहभागी झाली होती. असंख्य वर्षांची ही परंपरा मळगाव गाव एकोप्याने जपत आले आहे.

You cannot copy content of this page