प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन;शिरोडा येथे डॉ. रामचंद्र शिरोडकर यांची पुण्यतिथी साजरी
*⚡सावंतवाडी ता.१७-:* शिरोडासारख्या ग्रामीण भागात जन्म घेऊन स्वातंत्र्य काळात परदेशात पीएचडी मिळविणारे शिक्षण महर्षी रामचंद्र शिरोडकर यांचे चरित्र आजच्या काळातही प्रेरणास्रोत आहे. डॉ. शिरोडकर यांच्या विचारांवर चालणारा माणूस जीवनात कधीही अपयशी होणार नाही, असे प्रतिपादन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची ७३ वी पुण्यतिथीनिमित्त शिरोडा येथील संस्थेच्या शाखेत उदय विठ्ठल फणसेकर (क्षा.म.समाज सुकाणू समिती सदस्य) यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. रुपेश पाटील (महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार आणि मुख्यमंत्री महामित्र सोशल मीडिया पुरस्कार विजेते, महाराष्ट्रातील युवा व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सावंतवाडी) यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक प्रकाश गावडे, मिठबाव अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बी. के. चव्हाण, आनंद गावडे, राजेश शिरगांवकर, पंकज कासार, गुरुनाथ नाईक आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉ. रामचंद्र शिरोडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मुख्य व्याख्यानातून प्रा. रुपेश पाटील यांनी उपस्थितांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे विविध संदर्भासह स्पष्टीकरण केले. प्रा.पाटील पुढे म्हणाले की, डॉ. रामचंद्र शिरोडकर, थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्यासारखी महान व्यक्ती म्हणजे शिरोडा या गावाचे वैभव आहेत. आपणही त्यांचा हा वारसा समर्थपणे पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे. डॉ. शिरोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक जरी पैलू आपण आत्मसात केला तरी आपल्या जीवनाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रा. रुपेश पाटील यांनी विषद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय फणसेकर म्हणाले की, डॉ. रामचंद्र शिरोडकर यांच्या प्रचंड कष्टातून क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाची स्थापना झाली. संस्थेच्या वाटचालीसाठी अनेकांनी योगदान दिले आहे. संस्थेच्या उत्कर्षासाठी आजही आपण कटिबद्ध असून पाहिजे ते कष्ट उपसण्याची आपली तयारी आहे. शिरोडा या ठिकाणी लवकरच दिल्ली येथील नवनवीन कोर्सेसची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी शिरोडा व दशक्रोशीतील विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहनही श्री.फणसेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य बी.के. चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक पंकज कासार यांनी मानले.
