प्रादेशिक पर्यटन कार्यालयातर्फे ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षणाचे आयोजन

*⚡मालवण ता.१६-:* कोकणतील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविणे तसेच कोकणातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोकण विभागाच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालयामार्फत ‘ट्रॅव्हल गाईड’ (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणातील पर्यटनस्थळांबाबतचा इतिहास व माहिती पर्यटकांना मिळावी तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड, मुरबाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा सात ठिकाणी ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी किमान १८ वर्षे वयोमर्यादा असून शैक्षणिक पात्रतेसाठी ज्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे. त्यांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी https://www. maharashtratourism.gov.in/web/mh tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर भेट देऊन ३१ डिसेंबर पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थिना भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन (Indian Institute of Tourism and Travel Management) संस्थेच्या सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा याबाबत उपाययोजना, पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा, पर्यटकांशी संवाद साधताना पर्यटनस्थळाबाबतची माहिती गोष्टीरुपाने कशी मांडावी, असे विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्थानिक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी तज्ज्ञामार्फत प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसांचा असून प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे ‘टूर गाईड’ (पर्यटन मार्गदर्शक) म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल. या प्रशिक्षणाद्वारे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे मान्यताप्राप्त ‘टूर गाईड’ (पर्यटन मार्गदर्शक) मार्गदर्शन करणार आहेत. संधीचा लाभ जिल्हावासीयांनी घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page