तांब्याचीवाडी येथील श्री सिद्ध सातेरी देवीचा 18 डिसेंबर रोजी वार्षिक उत्सव

*⚡कणकवली ता.१६-:* तांब्याचीवाडी येथील श्री सिद्ध सातेरी देवीचा वार्षिक उत्सव शनिवार 18 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्ताने भक्ति-भावाचा अपूर्व सोहळा अनुभवण्याची संधी भाविकांना प्राप्त होणार आहे. भुदरगड तालुक्यामध्ये येणारे आणि कोल्हापूर-सिंधुदुर्ग यांच्या अगदी सिमेवर ,सह्याद्रीच्या शेवटच्या टोकावर वसलेले एक निसर्ग संपन्न गाव..गावाच्या पूर्वेला सुंदर मौनी जलाशय, उत्तरेला घनदाट जंगल व तिथूनच वेदगंगा या प्रसिद्ध नदीचे असलेले उगमस्थान आणि पश्चिम व दक्षिणेला ऐतिहासिक रांगणा किल्याला पूर्ण वळसा घातलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा. निसर्गाने भरभरून मुक्तहस्ते उधळण केलेले एक छोटेसे गाव. हे गाव जरी कोल्हापूर जिल्यात मोडत असले तरी इथली बोलीभाषा व परंपरा ह्या कोकणी परंपरेशी एकरूप आहेत.अगदी सर्व सण आणि उत्सव हीकोकणी रीती-परंपरेप्रमाणेच एकोप्याने उत्साहात साजरे केले जातात. तांब्याची वाडी गावची ग्रामदेवता असणाऱ्या श्री सिद्ध-सातेरी देवीचे मंदिर हे या गावाची शोभा वाढवीते. श्री सिद्ध सातेरी देवीचे देवस्थान हे पंचक्रोशीत एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. प्रतिवर्षी डिसेंबर मध्ये श्री दत्त जयंतीला या देवीचे वार्षिक असते कोकणात त्याला जत्रा किंवा दहीकाला अशीही ओळख आहे. या देवीच्या मंदिरापासून उत्तरेला घनदाट जंगलात असणाऱ्या सिद्धाच्या डोंगरावर देव श्री सिद्धेश्वराची गुहा आहे जी शेकडो वर्षांपूर्वी पांडवकालीन असल्याची बोलले जाते.या देवीच्या वार्षिका दिवशी देव श्री सिद्धेश्वर आणि देवी सातेरी यांची भेट होते अशी फार पूर्वी पासूनची आख्यायिका आहे. या दिवशी मंदिर परिसर हा कोकणातून येणाऱ्या लहानमोठ्या व्यापाऱयांच्या दुकानांनी भरून गेलेला असतो. कोकणची खास ओळख असलेले खाजा व सुगंधी फुलांचे गजरे हे परिसराचे वातावरण उल्हासित करून जातात. हा दिवस इतर भाविकांप्रमाणेच माहेरवाशिणींसाठीहि खास असतो.देवीला आजच्या दिवशी माहेरवाशिणींची ओढ लागलेली असते असे बोलले जाते म्हणून या दिवशी झाडून सर्व माहेरवाशिणी न चुकता देवीची ओटी भरण्यासाठी हजेरी लावतात.रात्री देवीची वाजत गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुक निघते.त्या नंतर देवीची ओटी भरणे,नवस बोलणे व फेडणे या सारखे धार्मिक विधी गावच्या परंपरेप्रमाणे मोठ्या भक्ति-भावात व उत्साहात पार पडतात.रात्री कोकणी दशावतारी नाट्य प्रयोग ठेवलेला असतो ज्या मुळे या उत्सवाला खरे मूर्त स्वरूप येते. दिवसभर भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी हौशी तरुणांनी क्रिकेट सामान्यांचेहि आयोजन केलेले असते त्याचाही आनंद घेता येतो.अत्यंत अवर्णनीय असा हा सोहळा असतो. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्यामुळे पंचक्रोशीतील गावातून व कोकणातून येणाऱ्या असंख्य भक्तांची दर्शनासाठी पहाटे पासूनच मोठी रांग लागलेली असते. कुडाळ ,सावंतवाडी व कणकवली विभागातून येणाऱ्या भाविकांची संख्या हि लक्षणीय असते, हे भाविक घाटमार्गे पायीच येणे पसंत करतात तर जिल्हयातून येणाऱ्या भाविकांसाठी गारगोटी आगारातून महामंडळाने व्यवस्था केलेली असते शिवाय खाजगी वाहनांचीही मोठ्या प्रमाणात व्यवस्था असते. या सर्व सोहळ्याचे सुंदर नियोजन हे जेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावचे ग्रामस्थ मंडळ उत्तमरित्या पाहात असते. या वर्षी देवीचे वार्षिक हे 18 डिसेंबर 2021 रोजी श्री दत्त जयंतीला साजरे होत असून सर्व भाविकांनी देवीच्या दर्शनाचा व या दिवशी होणाऱ्या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे . -भास्कर लाड, कणकवली

You cannot copy content of this page