जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांची माहिती
ओरोस-:विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राथमिक शिक्षक समितीचे 15 डिसेंबर रोजीचे जि प सिंधुदुर्ग समोरील धरणे आंदोलन सध्या जिल्हयात असलेल्या मनाई आदेशामुळे व सदर प्रश्नाबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी संघटना शिष्टमंडळाशी अधिकृत बैठक घेऊन चर्चा करून प्रलंबित प्रश्नांची कार्यवाही लगतच्या कालावधीत करण्याचे आश्वस्त केल्याने 31 डिसेंबर पर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे असे जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम यांनी व्यक्त केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ति विषय , आंतरजिल्हा बदली आॅनलाईन प्रक्रिया टप्पा क्र 5 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशंदान पेन्शनधारक शिक्षकांच्या गेली 18 वर्षे दरमहा कपात केलेल्या रक्कमांचा हिशोबपत्रके मिळालेली नाहीत,नविन राष्ट्रीय पेन्शन योजनेतील विविध अडचणी असे महत्वाचे प्रश्न प्रलंबित राहिल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी तसेच प्रशासन व शासनाचे लक्षवेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने 15 डिसेंबर रोजी दु 2.30 ते 5.30 वेळेत जि प सिंधुदुर्ग समोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा मुख्यकार्यकारीअधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दि 8 डिसेंबर रोजी निवेदन नोटीसद्वारे देण्यात आला होता.
या आंदोलन पाश्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वा आपल्या दालनात शिक्षक समिती शिष्टमंडळाची अधिकृत बैठक आयोजित केली यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन कदम, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, शिक्षकनेते नंदकुमार राणे, जिल्हासरचिटणीस सचिन मदने, प्रवक्ता सुनिल चव्हाण, राज्यसहसचिव नामदेव जांभवडेकर, संदिप मिराशी, आपा सावंत, कार्याध्यक्ष नारायण नाईक, उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, मालवण तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, कार्याध्यक्ष रूपेश गरूड, वेंगुर्ला सचिव सिताराम लांबर, संतोष वारंग, वैभववाडी अध्यक्ष रफिक बोबडे, सचिव महादेव शेट्ये, कणकवली शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस,दिपक पात्रे, आंतरजिल्हाप्रिनिधी चांगदेव चव्हाण, मंगेश काळे, अजय सरतापे, सरफराज पटेल आदी उपस्थित होते.
आंतरजिल्हाबदली टप्पा क्र 1,3,4 मधील 105 शिक्षकांना अद्यापही एकमेव सिंधुदुर्ग जि प ने कार्यमुक्त केलेले नाही याबाबत शिक्षक समिती ने तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हयात 10 टक्के पेक्षा जास्त असलेले रिक्तपदांचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षक समितीने काही उपाय सुचविले आहेत. त्या उपायांची अमलबजावणी येत्या 15 दिवसात करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. फेब्रुवारी मध्ये होणार्या आंतरजिल्हाबदली टप्पा क्र 5 साठी आॅनलाईन अर्ज भरण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळावी यासाठी प्रयत्न करणे, रिक्त पदे तात्काळ शिक्षक भरतीने भरण्यात यावीत, हंगामी शिक्षक भरतीसाठी सिंधुदुर्ग जि प कडुन शासनाला प्रस्ताव पाठविण्यात यावा ,वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावेत, अंशदान पेन्शनच्या दरमहाच्या कपातीच्या रक्कमांचा हिशोब प्रत्येक शिक्षकाला मिळावा, नवीन राष्ट्रीय पेन्शन योजनेतील अडचणी दूर कराव्यात, दरमहा 1 तारिखला वेतन मिळण्यासाठी सी एम पी वेतन प्रणाली कार्यान्वित करावी,निवडश्रेणी यादी प्रसिद्ध करण्यात यावी ,शाळांना वीजबीलासाठी व अन्य अनुदाने तात्काळ देण्यात यावीत, शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात यावीत अशा विविध प्रलंबित प्रश्नाची कार्यवाही 15 दिवसात न झाल्यास 31डिसेंबर नंतर सदरचे स्थगित धरणे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असे शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने मुख्यकार्यकारीअधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी जि प सिंधुदुर्ग यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांची माहिती
