कणकवली येथे १९ डिसेंबरला रंगणार मालवणी

कवितांचा नाट्याविष्कार ‘भावबंध कोंकणचे’

सिंधुदुर्गनगरी, दि. १५: मालवणी मुलखातील भावभावनांच्या ताण्याबाण्यांचे दर्शन घडविणाऱ्या मालवणी कवितांचे अभिवाचन व नाट्याविष्कार असा ‘भावबंध कोंकणचे’ हा अनोखा कार्यक्रम रविवार १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान येथे होणार असल्याची माहिती कवयित्री डॉ. सई लळीत यांनी दिली.

याबाबत माहिती देताना कार्यक्रमाच्या दिग्दर्शक असलेल्या डॉ. लळीत म्हणाल्या की, मालवणी मुलुख, मालवणी माणुस, मालवणी बोली, इथली संस्कृती हे एक आगळेवेगळे रसायन आहे. माझ्या अनेक मालवणी कवितांमधुन हे भावविश्व शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न मी केला आहे. रसिकांपर्यंत कविता अधिक परिणामकारकपणे पोचविण्यासाठी कवितांचे अभिवाचन आणि त्याचवेळी त्यावर आधारित रंगमंचीय नाट्याविष्कार अशा ‘भावबंध कोंकणचे’ या कार्यक्रमाची निर्मिती मी केली आहे. एकाचवेळी कविता ऐकत असताना त्या कवितेतील प्रसंग प्रेक्षकांसमोर सादर होत असतो. प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देऊन जाणाऱ्या या कार्यक्रमात कविता रसिक प्रेक्षकांशी हितगुज करतात.

या कार्यक्रमात वांगड, चाकरमानी, आज घरवाले येतले, सोरगत, बाशिंगबळ, शबय, गोडो राक्षस, लास्टो पावस, चालता हो, मऊसा चांन्ना पडांदेत अशा अनेक कवितांचे अभिवाचन केले जाईल. त्याचवेळी रंगमंचावर कलाकार त्या कवितांमधील भावभावनांचा नाट्याविष्कार अभिनित करतील. या कलाकारांमध्ये ‘गाव गाता गजाली’ आणि ‘ रात्रीस खेळ चाले’ मालिकांमधील कलाकारांचा समावेश आहे. मंगल राणे, निलेश पवार, शरद सावंत, राकेश काणेकर, श्रेयस शिंदे, सुप्रिया प्रभुमिराशी, प्रियांका मुसळे, श्रीया शिंदे, सत्यवान गावकर, अदिती लळीत आणि अभय खडपकर हे कलाकार या सहभागी आहेत. कुटुंबिय, मित्रमंडळींसह अवश्य पहाण्यासारख्या या कार्यक्रमाचे प्रयोग याआधी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर, अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन, मालवणी बोली साहित्य संमेलनामध्ये झाले आहेत आणि त्याला रसिंकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका कार्यक्रमाआधी एक तास हॉलवर उपलब्ध असतील, अशी माहिती डॉ. लळीत यांनी दिली. ००००००

You cannot copy content of this page