खाण मालकाने केले होते अतिक्रमण;प स सदस्य सुनील घाडीगांवकर यांनी उचलून धरला होता विषय
मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील ओवळीये धनगरवाडी ते हेदुळ या मुख्य रस्त्यावरच एका चिरेखाण मालकाने चिरेखाणीतील चिरे व माती टाकत अतिक्रमण केल्याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारीला माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी पाठबळ दिल्यानंतर जिल्हा व महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलत खाण मालकाचा परवाना रद्द करत हे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज जि. प. बांधकाम विभागामार्फत हे अतिक्रमण हटविण्यात आले हे अतिक्रमण हटविण्यात आल्याने ग्रामस्थांच्या मागणीला न्याय मिळाला आहे. मालवण तालुक्यातील ओवळीये धनगरवाडी ते हेदूळ (ग्रा.मा. क्र. १५८) या रस्त्याच्या नजीक अनेक चिरेखाणी आहेत. मात्र तेथील एका चिरे खाण मालकाने या रस्त्यावरच ठिकठिकाणी चिरे व माती टाकून अतिक्रमण केले. यामुळे येथील ग्रामस्थांचा ये- जा करण्याचा मुख्य रस्ता बंद झाला. याबाबत ग्रामस्थानी तक्रार केल्यानंतर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य व गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी हा प्रश्न उचलून धरत अतिक्रमण हटविण्याबाबत आवाज उठविला. याबाबत सुनील घाडीगांवकर व जि. प.बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांचे लक्ष वेधले. त्यानंतर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना याप्रश्नी निवेदन सादर करण्यात आले होते. अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ववत करावा, अन्यथा रास्तारोको करून उपोषण छेडले जाईल, असा इशारा ओवळीये धनगरवाडी ग्रामस्थ व सुनील घाडीगाकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेत संबंधित खाण मालकाचा परवाना रद्द करत सदरचे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश मालवण तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर या रस्त्यावर पुन्हा माती टाकून अतिक्रमण करण्यात आल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून प्राप्त झाल्यावर हे अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेश तहसीलदार यांनी जि.प. बांधकाम विभाग पंचायत समिती मालवण यांना दिले होते. याबाबत सुनील घाडीगांवकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला होता. तहसीलदारांच्या आदेशानंतर आज मंगळवारी दुपारी जि. प. बांधकाम विभागाकडून ओवळीये धनगरवाडी ते हेदूळ या रस्त्यावरील माती व चिऱ्यांचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटवून रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही प्रशासन व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. यावेळी जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, पं. स. सभापती अजिंक्य पाताडे, हेदुळ सरपंच नंददीपक गावडे, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत, उपसरपंच सत्यविजय गावकर, बांधकाम विभाग उपअभियंता श्री. सावर्डेकर, ग्रामसेवक सावंत, ग्रामसेवक पिळणकर, पोलीस रुक्मांगत मुंडे, ग्रामस्थ समीर सावंत, नंदू आंगणे, लक्ष्मण शिंगाडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. ओवळीये धनगरवाडी- हेदूळ रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी सुनील घाडीगांवकर यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला आहे. याबाबत आपणही जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यात जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे महत्वाचे सहकार्य लाभले. जिल्हाधिकरिव महसूल प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आज हे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, असे यावेळी जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी सांगितले. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केल्याबाबत ग्रामस्थानी सुनील घाडीगांवकर, महेंद्र चव्हाण यांचे आभार मानले.