श्री देव घोडेमुखाचा आज जत्रोत्सव

पेंडुर परिसरात भक्तिमय वातावरण;नवसफेडीसाठी भाविकांची होणार गर्दी

*⚡सावंतवाडी ता.०८विनय वाडकर-:* कोंब्याची जत्रा’ म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेला पेंडुर (ता. वेंगुर्ला) येथील श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव आज, ८ डिसेंबर रोजी होत आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती असलेल्या श्री देव घोडेमुखाच्या या वार्षिक सोहळ्यामुळे पेंडुरसह परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.

श्री देव घोडेमुख हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सावंतवाडी – रेडी मार्गावर पेंडुर गावातील उंच डोंगरमाथ्यावर निसर्गरम्य परिसरात घोडेमुख देवालय वसले आहे. मंदिरात जाण्यासाठी बिकट आणि तीव्र चढावाचा मार्ग पार करावा लागतो. असे असले तरी हजारो भाविक हा मार्ग पार करून ‘श्रीं’चे दर्शन घेतात. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला कोंब्याचा नवस बोलला जातो आणि जत्रोत्सवादिवशी तो फेडला जातो. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने पाळली जाते. राज्यभरातून हजारो भाविक जत्रोत्सवाला उपस्थित राहून श्री देव घोडेमुख चरणी नतमस्त्तक होतात.

जत्रोत्सवादिवशी सकाळपासूनच भाविकांची मंदिर परिसरात वर्दळ सुरु होते. अवघड चढणीचा मार्ग पार करून भाविक दर्शनासाठी येतात आणि श्री घोडेमुख चरणी लीन होतात.

सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास देव तरंगकाठीचे वाजतगाजत मंदिरात आगमन होते. देवाचा कौल मिळाल्यानंतर नवसफेडीच्या कार्यक्रमास सुरुवात होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरु असतो. त्यानंतर जत्रोत्सवाची सांगता होते.

दरम्यान, जत्रोत्सवानिमित्त परिसरात विविध प्रकारची दुकानें थाटण्यात आली आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची साफसफाई करण्यात आली आहे. डोंगरमाथ्यावर वसलेल्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून गाभाऱ्यात फुलांची आरास मांडली आहे.

मास्कचा वापर करावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व भाविकांनी ‘मास्क’चा वापर करावा, असे आवाहन पेंडुर ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page