भाजप किसान मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन;अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा
*⚡सावंतवाडी ता.०७-:* नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकासह आंबा आणि काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय मदत तसेच विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल. याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास भाजप किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बांदा मंडल अध्यक्ष प्रवीण देसाई यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर अखेर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा भातपिकासह आंबा आणि काजू या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आंबा, काजूच्या मोहोराचे अपरिमित नुकसान झाले आहे. बँकेकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणीसह इतर कामे केली आहेत. या नुकसानीमुळे त्यांचा सर्व खर्च वाया जाणार आहे. शेतकऱ्यांना शासनस्तरावरून नुकसान भरपाई तसेच विमा संरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मूल्यांकन करावे. याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास भाजप किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
