जात पडताळणी पावती सुद्धा चालते

निवडणूक निर्णय अधिकारी गीते यांची माहिती;राखीव उमेदवारांना मिळाला दिलासा

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढविणारे उमेदवार जात पडताळणीची पावती उमेदवारी अर्जासोबत जोडू शकतात. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. अशी माहिती वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राखीव जागांवरील उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर असून वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. गिते म्हणाले, 24 नोव्हेंबर रोजी नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. दरम्यान राखीव जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनाकडे जात पडताळणी असणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने ती अट शिथिल केली आहे. उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पावती किंवा पोच उमेदवारी अर्जा सोबत जोडता येणार आहे. राखीव जागांवरील उमेदवारांना 7 तारखेला पडताळणीची पावती मिळाली नाही, तरी उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. परंतु ती पावती बुधवार दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत देणे बंधनकारक आहे. त्याच दिवशी छाननी प्रक्रिया 11 वाजता सुरू होणार आहे. परंतु ज्याची पोच राहिली असल्यास छाननी प्रक्रिया दुपारी 12 नंतर केली जाईल. राखीव जागेवरून निवडून आलेल्या उमेदवारांनी जात पडताळणी पुढील 12 महिन्यात देणे आवश्यक आहे. पडताळणी पत्र न.पं. चे मुख्याधिकारी यांच्याकडे जमा करावयाचे आहे. सोमवार दि. 6 डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत एकही उमेदवारी अर्ज प्राप्त नाही. असे श्री गिते यांनी सांगितले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या अटी व शर्तींचे सर्वांनी पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. अशा सूचना गिते यांनी दिल्या आहेत.

You cannot copy content of this page