तरूणांबरोबरच राष्ट्र वाचविण्यासाठी शर्तीच्या प्रयत्नांची गरज: प्रा.महेंद्र नाटेकर

*⚡कणकवली ता.०६-:* आज भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत युवकांची संख्या अधिक आहे . देशाचे सामर्थ्य त्या देशातील तरुणांच्या प्रमाणावर ओळखले जाते . परंतु हे तरूण वाढत्या प्रमाणात गांजा , अफू , चरस , कोकेन , मेफेझन , इत्यादी अमली पदार्थाच्या विळख्यात सापडत आहेत . त्यामुळे अशा ह्या युवकांबरोबरच कुटुंब , समाज आणि संपूर्ण राष्ट्रच उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे . यासाठी शिक्षक पालक , समाजसुधारक व राज्यकर्ते यांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून तरूणांबरोबरच राष्ट्र वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्याची गरज आहे . असे आग्रही प्रतिपादन प्रा . महेंद्र नाटेकर यांनी केले आहे . स्वतंत्र कोकणची बैठक आयोजित केली होती त्यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते.यावेळी जे . जे. दळवी , वाय.जी. राणे , प्रा. सुभाष गोवेकर , ए. वाय. चिलवान , प्रा. प्रकाश अधिकारी, एस. आर. धनसे , माधव काणेकर, सतीश करमळकर , उदय लाड , इत्यादी उपस्थित होते . प्रा. नाटेकर पुढे म्हणाले , हे असले अमली पदार्थ प्रामुख्याने पाकिस्तान , चीन इत्यादी शत्रू राष्ट्राच्या सरहद्दीवरून भारतामध्ये येतात . शाळा – महाविदयालयाच्या परिसरात गुप्तरित्या उपलब्ध होतात . तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध होतात . तालुक्याच्या ठिकाणी मॉल , पानपट्टीची दुकाने इत्यादी ठिकाणी उपलब्ध होतात . प्रारंभी स्वस्त दरात विक्री करतात . एकदा त्याची गोडी लागली की भरमसाठ दरात विकून ते गवर होतात . आपल्या देशातही काही लोक अफू – गांज्याचे उत्पन्न घेतात , त्याला वेळीच आवर घातला पाहिजे . सत्ता आणि पैसा , पैसा आणि सत्ता यांचा ध्यास घेतलेले तथा कथित लोक प्रतिनिधी निवडून येण्यासाठी मते खरेदी करतात . मतदारांना दारू पाजतात . अमली पदार्थाचे आमीष दाखवतात , असे बोलले जाते. जागरूक नागरिकांनी सावध होऊन त्यांचे हे बेत हाणून पाडले पाहिजेत , तरच आपल्या देशाला भवितव्य आहे असे शेवटी नाटेकर म्हणाले . उपस्थित सर्वांनी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला . चिलवान सरांनी सर्वांचे आभार मानले .

You cannot copy content of this page