अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांची दिशाभूल : खोदाई केलेला चर धोकादायक
*⚡बांदा ता.०४-:* बांदा-शिरोडा मार्गाच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनसाठी मडुरा तिठा येथे खोदाई करण्यात आलेला चर दिवसेंदिवस धोकादायक बनून अपघात घडत आहेत. अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही अधिकारी दुर्लक्ष किंवा दिशाभूल करत असल्याने अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे. जवळपास एक वर्षांचा कालावधी उलटूनही खोदण्यात आलेला रस्ता पूर्वस्थितीत न केल्याने तसेच येत्या चार दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच संपूर्ण मडुरा पंचक्रोशीचे ग्रामस्थ, वाहनचालक, प्रवासी उपोषण छेडणार असल्याचा इशारा भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य तथा मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे यांनी दिला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आलेले ठेकेदार अशोक पवार यांना मडुरा तिठा येथे ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागले. अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करीत अशोक पवार यांना वाहनचालकांनी धारेवर धरले. श्री. आवटी यांनी सदर ठिकाणी येतो असे सांगून ठेकेदाराला पाठवून आमची दिशाभूल केली असल्याचे तात्या शेर्लेकर म्हणाले.
