वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग या गावांसाठी संयुक्त नळपाणी योजनानेसाठी ग्रामसभा घेऊन यशस्वी करा…

पंचायत समिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांचे आवाहन..

मालवण, दि प्रतिनिधी पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या वायरी भुतनाथ, तारकर्ली, देवबाग या तीन गावांतील ग्रामस्थांना तसेच पर्यटकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी धामापूर नळपाणी योजनेवरून संयुक्त नळपाणी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध झाला आहे. या अनुषंगाने या तिन्ही गावांनी या नळपाणी योजना मार्गी लागावी यासाठी 15 डिसेंबरपूर्वी विशेष ग्रामसभा घेत ती यशस्वी करावी असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी आज येथे केले. तालुक्यातील वायरी भुतनाथ, तारकर्ली, देवबाग या किनारपट्टीलगतच्या तीन गावांसाठी पालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेवरून स्वतंत्ररित्या संयुक्त नळपाणी योजना राबविण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आज येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दालनात संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पालिकेच्या नगर अभियंता एस. एस. हळदणकर, जीवन प्राधीकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. एस. घाटगे, शाखा अभियंता आर. एन. मेस्त्री, वायरी भुतनाथ सरपंच घनश्याम ढोके, उपसरपंच विरेश नाईक, तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर, देवबाग उपसरपंच मोरेश्‍वर धुरी, ग्रामपंचायत सदस्य फिलसू फर्नांडिस, ग्रामसेवक पी. व्ही. सुतार, पी. टी. पेडणेकर, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी संयुक्त नळपाणी योजनेविषयीची सविस्तर माहिती तिन्ही गावच्या सरपंच, उपसरपंच यांना देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत शासनाच्या किमान दराने गावांना पाणीपुरवठा व्हावा असे ठराव संबंधित ग्रामपंचायतीने पालिकेस द्यावेत असे सांगण्यात आले. तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर यांनी आपल्या गावात ही नळपाणी योजना व्हावी अशी इच्छा आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थांचा याला विरोध असून त्यांच्याकडून स्वतंत्ररित्या नळपाणी योजना राबविण्यात यावी अशी मागणी होत आहे असे सांगितले. यावर सद्यःस्थितीत तारकर्लीत स्वतंत्र नळपाणी योजना राबविणे शक्य नसून पाण्याचा स्रोतही उपलब्ध नाही. गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. यात या नळपाणी योजनेचे पाणी घेण्याची सक्ती ग्रामस्थांवर असणार नाही. ज्यांना पाणी हवे आहे त्यांना मीटरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे असे गटविकास अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. वायरी भुतनाथ, देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांनी गावात ही नळपाणी योजना राबविण्यास यावेळी सहमती दर्शविली. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठीच ही योजना राबविली जात आहे. सद्यःस्थितीत यासाठी 6 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून घेतला जाणार आहे. या तिन्ही गावात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने पर्यटकांनाही या नळपाणी योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून देणे व्यावसायिकांना सोईस्कर ठरणार आहे. 6 लक्ष लिटर पाणी प्रतिदिन या तीन गावांना लागणार आहे. भविष्याचा विचार करता पाण्याचा स्रोत उपलब्ध झाल्यास त्याचाही विचार केला जाईल असे जिल्हा परिषद सदस्य श्री. खोबरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. पर्यटकांचा विचार करता तिन्ही ग्रामपंचायतींनी एकत्रित येत या नळपाणी योजनेच्या पुरवठ्याबाबत विचार केल्यास यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भविष्यात वाढ होण्यास मदत मिळणार आहे. या योजनेच्या पार्श्‍वभूमीवर तिन्ही ग्रामपंचायतीची शिखर समिती स्थापन करावी लागणार आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यत तिन्ही ग्रामपंचायतींनी नळपाणी योजनेच्या विषयासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून ती 25 टक्के यशस्वी करायची आहे. यासाठी सीआरपी, आशा, अंगणवाडी सेविका, बचतगट, शिक्षक यांना सहभागी करून घ्यावे. या विशेष ग्रामसभेसाठी गावात स्पीकरद्वारे जागृती करण्यात यावी असे आवाहन गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी 14 डिसेंबरला सकाळी दहा वाजता वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीची तर दुपारी तीन वाजता तारकर्ली ग्रामपंचायतीची, 15 डिसेंबरला दुपारी तीन वाजता देवबाग ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे ठरले. *फोटो* – वायरी भुतनाथ, तारकर्ली, देवबाग या तीन गावांसाठी राबविण्यात येणार्‍या संयुक्त नळपाणी योजनेच्या पार्श्‍वभूमीवर बैठकीत गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. शेजारी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, अन्य उपस्थित सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी

You cannot copy content of this page