*⚡कणकवली ता.२९-:* मुंबई गोवा महामार्गावरील जानवली येथील काही भाग मृत्यूचा सापळा बनला असून काल रात्री आणखी एका युवकाला प्राण गमवावा लागला आहे.अज्ञात कारने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गजानन केशव शेट्ये ( सध्या रा. जानवली वाकाडवाडी , मूळ रा.तोंडवली, कणकवली ) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जानवली टिव्हीएस शोरूम नजीक घडला. वरवडे प्राथ.आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट असलेले गजानन शेट्ये हे आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा क्र. MH -07 -Y – 8488 घेऊन कणकवलीच्या दिशेने येत होते.त्याचवेळी कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात कारचालकाने मागून शेट्ये यांच्या ऍक्टिव्हाला धडक देऊन कारचालक कारसह पसार झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून रस्त्यावर फेरफटका मारणारे दामोदर आबाजी सावंत ( रा.जानवली, डोंगरेवाडी ) यांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत जानवली सरपंच शुभदा रावराणे, पोलिस पाटील मोहन सावंत,तुकाराम तावडे, आशिष राणे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दामोदर सावंत यांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स मागवून अपघातग्रस्त शेट्ये याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यावेळी मदत कार्यात मकरंद सावंत, प्रशांत राणे यांनी भाग घेतला.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच गजानन शेट्ये यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गजानन शेट्ये यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली भाऊ वहिनी असा परिवार आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात कारचालकाने कारसह अपघात स्थळावरून पलायन केले असले तरी सीसीटीव्हीमध्ये अपघाताची घटना रेकॉर्ड झाल्याची दाट शक्यता आहे.
जानवलीतील अपघातात अज्ञात कारच्या धडकेत इसम जागीच ठार
