केव्हा थांबणार ससेहोलपट?;स्वप्नपूर्तीसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज
*⚡सावंतवाडी ता.२७ संतोष ठाकूर-:* सिंधुदुर्ग ज़िल्ह्यातील आरोग्य सेवा विविध समस्यांमुळे पूर्णतः कोलमडली आहे. खासगी रुग्णालयांची अवाढव्य बिले भरण्याची क्षमता सर्वासामान्यांमध्ये नाही. गोवा रुग्णालयानेही अटी-शर्ती ठेवल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत नव्याने होऊ घातलेल्या मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयावर सर्वांच्या आशा स्थिरावल्या असून तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी दाखविलेले स्वप्न सत्यात उतरेल काय, याकडे ज़िल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत.
सिंधुदुर्ग ज़िल्ह्यात ज़िल्हा रुग्णालयासह उपज़िल्हा रुग्णालये कार्यरत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रेही सेवा देत आहेत. मात्र, बहुतांशी रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. उपलब्ध असलेला कर्मचारी वर्गही पुरेसा नाही. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी वर्गाकडून काम करून घेताना अधिकाऱ्यांची दमछाक होते. गंभीर घटनेवेळी तर फारच अडचणी निर्माण होतात. आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता हे तर येथील रुग्णालयांचे मुख्य दुखणे आहे. या रुग्णालयातून त्या रुग्णालयात असे करताकरता उपचारास विलंब झाल्याने रुग्णाचा जीव धोक्यात येतो. गेल्या काही वर्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाणीचेही अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे परजिंल्ह्यातील उच्चशिक्षित वैद्यकीय अधिकारी येथे काम करण्यास इच्छुक नसल्याने तज्ज्ञ अधिकाऱ्यांअभावी येथील आरोग्यसेवेवर मोठा परिणाम होत आहे. गंभीर आजार किंवा अपघातातील रुग्णांना गोवा-बांबोळी येथे हलवावे लागते. गोवा येथे उपचार मिळेपर्यंत किंवा वाटेतच रुग्ण दगावण्याची शक्यता असते. असे अनेकदा घडलेही आहे.
गोवा रुग्णालयानेही फिरविली पाठ
गेल्या दोन-तीन वर्षात गोवा रुग्णालयानेही सिंधुदुर्गातील रुग्णांना मोफत उपचार देण्यास नकार दिला होता. त्यानंतर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांनंतर काही अंशी ही सेवा सुरु ठेवली आहे. मात्र, मोठ्या शस्त्रक्रि्यांसाठी शुल्क आकारले जात असल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून ज़िल्हावासियांची होत असलेली ससेहोलपट टाळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालय मंजूर केले. या रुग्णालयासाठी सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथे जागा निश्चित करण्यात आली. पण जागेच्या वादामुळे हा विषय अद्यापही अधांतरीच राहिला आहे. मात्र, आमदार केसरकर यांनी अद्याप आशा सोडली नसून पर्यायी जागेसाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना लवकरच यश येऊन आरोग्यसेवेसाठीच्या यातना संपुष्टात येतील, असा विश्वास समस्त ज़िल्हावासियांना आहे.
*एकत्रित प्रयत्न केल्यास यश नक्की!*
आरोग्य सेवा हा ज़िल्हावासियांना, विशेषतः येथील सर्वसामान्यांना भेडसावणारा मुख्य प्रश्न आहे. मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयाच्या घोषणेनंतर ज़िल्हावासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, यासाठी सर्व पक्षीयांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे झाल्यास नक्कीच यश मिळून ज़िल्हावासियांची आरोग्यसेवेची होत असलेली आबाळ थांबेल याबाबत शंका नाही.
