त्यामुळे केंद्रीयमंत्री राणेंवर आ नाईक यांनी गद्दारीवरून बोलणे टाळावे;माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांची आ नाईकांवर टीका
*⚡मालवण ता.२६-:* खासदारकीच्या निवडणुकीत कोणी कोणाशी गद्दारी केली , कणकवली नगरपालिका निवडणुकीतही संदेश पारकर यांच्याशी कोणी गद्दारीचे धडे गिरवले हे सर्वश्रुत असल्याने आमदार वैभव नाईक यांनी गद्दारी या शब्दावर बोलणे टाळावे केवळ भाजचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे आणि कुटुंबियांवर टीका करून जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याचे दिवस आता संपल्याने आम. नाईक यांनी मतदार संघात रखडलेला विकास आणि रस्त्यांची झालेली दुर्दशा यावर भाष्य करावे असा सणसणीत टोला मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेतून लगावतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भाजप चे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व असल्याने कार्यकर्त्यांवर रागवण्याचा आणि बोलण्याचा अधिकार राणेंना आहे त्यामुळे आम. नाईक यांनी भाजपच्या कौटुंबिक विषयात नाक न खुपसता स्वतःच्या पक्षाची काळजी करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मालवण येथील भाजप कार्यालयात सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप शहर अध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक गणेश कुशे, जगदीश गावकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, नगरसेविका पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, प्रमोद करलकर आदी व इतर उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर म्हणाले, ४० वर्ष प्रामाणिक आणि निष्ठने शिवसेनेत काम करणाऱ्या ना. नारायण राणे यांना पुत्रप्रेमा पोटी शिवसेनाप्रमुखांनी पक्षातून निलंबित केले. तर ९ वर्ष काँग्रेस पक्षात प्रामाणिक पणे काम करणाऱ्या ना. राणे यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी दिलेले वचन पूर्ण न केल्याने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी लागली त्यामुळे यात गद्दारीचा प्रश्न आलाच कुठे असा सवाल उपस्थित करून श्री. आचरेकर म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष निर्माण करून महाराष्ट्रात आपली ताकत सिद्ध केली आणि त्यामुळेच भाजपच्या आग्रहामुळे त्यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. नामदार राणे हे भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व असल्याने त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये आदर आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांवर रागवण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार राणेंना आहे. भाजप पक्षाच्या अंतर्गत गोष्टीत डोकावून पाहण्यापेक्षा आम. नाईक यांनी शिवसेनेत किती गटबाजी आणि गळती आहे याचे आत्मपरीक्षण करावे असा हल्लाबोलही श्री. आचरेकर यांनी आम. नाईक यांच्यावर केला आहे. ते पुढे म्हणाले गेले तीन तपे दहशतवाद …दहशतवादावरून बोंबलणाऱ्या आम. वैभव नाईक यांनी आता पुस्तक बदलले आहे. आता नवीन अभ्यासक्रम आल्याने विकासाच्या प्रश्नावर आम. नाईक यांनी भाष्य करावे असा टोलाही त्यांनी लगावला. आमदार म्हणून काम करणाऱ्या वैभव नाईक यांनी तालुक्यात जी रस्त्याची वाताहत लागली आहे ती डोळे उघडून बघावी नुसती घोषणाबाजी करून रस्त्यांची दुर्दशा थांबणार नाही. मालवण बसस्थानकावर तीन वर्षांपूर्वी नवीन बसस्थानक आणि मल्टिप्लेक्स सिनेमागृह बांधण्यासाठी जे सापळे उभे करून ठेवले आहेत ते आता गंजून गेले आहेत त्याकडे डोळे निरखून पहावे. सध्या मालवण शहरात विविध विकासकामांची भूमिपूजने होत आहेत परंतु मागे झालेल्या कामांचे काय झाले याचीही पाहणी आम. नाईक यांनी करावी अशी टीका सुदेश आचरेकर यांनी केली आहे. दुसऱ्यांवर शिंतोडे उडविणाऱ्यांनी आपण किती प्रामाणिक आहोत याची आत्मपरीक्षण करावे. आमदार वैभव नाईक यांनी स्वतःच्या मतदार संघात लक्ष घालावा. रस्त्यांच्या अधोगती कडे लक्ष द्यावे, मालवण नगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेकडून चाललेल्या कारभाराकडे लक्ष द्यावे, शहरात विकासकामांची भूमिपूजन होत असताना त्यातील किती कामे पूर्ण झाली याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी घ्यावी, स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून हा प्रकार आता जुना झाल्याचे सुदेश आचरेकर म्हणाले.
