महिला मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ मिळणार…

संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर यांची माहिती

मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना शासनाच्या विशेष आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत पॅकेजचा लाभ येत्या काही दिवसात दिला जाईल, असे लेखी आश्वासन मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. रविंद्र मालवणकर यांनी संस्थेला दिल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील सागरी मच्छिमारांना क्यार व महाचक्रीवादळामुळे पूर्णक्षमतेने मासेमारी करता आली नव्हती. त्याप्रमाणे मत्स्य व्यावसायिक महिलांनाही त्याचा आर्थिक फटका बसल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेने फेब्रुवारी महिन्यात मालवण मत्स्य कार्यालयासमोर सुमारे २००० महिला मच्छिमारांचे आक्रोश आंदोलन छेडले होते. त्यानंतरही गेले ९ महिने संस्था सभासदांना पॅकेजचे वाटप झाले नव्हते. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर यांनी पुन्हा एकदा आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी वाटप करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. संस्थेच्या सुमारे ३६५० सभासद असून त्यातील किती सभासदांना याचा लाभ होतो हे वाटप झाल्यानंतर समजणार आहे, असेही सौ. स्नेहा केरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page