लवकर मदत मिळण्यासाठी ग्रामस्थानी दिले तहसीलदारांना निवेदन
सावंतवाडी-:सावंतवाडी तालुक्यात २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या नुकसानीची भरपाई अजुन न मिळाल्याने शेर्ले गावातील व्यापारी व ग्रामस्थांनी आज स्थानिक आमदार दीपक केसरकर व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी तालुक्यात २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून घरगुती नुकसान भरपाई १० हजार आणि व्यापाऱ्यांसाठी ५० हजार याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे. यावेळी आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या इन्सुली, निगुडे, बांदा येथील नुकसानग्रस्तांची नुकसान भरपाई देण्यात आली असून, शेर्ले गावातील नुकसानग्रस्तांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आज तेथील ग्रामस्थांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई सबंधित व्यापारी आणि ग्रामस्थांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी केली आहे. यापूर्वी देखील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन नुकसान भरपाई न मिळाल्या बाबत माहिती दिली होती. त्यावेळी पूरग्रस्तांची यादी देण्यात आली असून, त्याप्रमाणे बँक खात्यात पैसे जमा होतील असे सांगण्यात आले होते. परंतु, यादीत नाव असून देखील अद्याप कोणत्याही प्रकारची मदत या नुकसान ग्रस्त नागरिकांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा तहसीलदार यांचे लक्ष तेथील नागरिक व व्यापाऱ्यांनी वेधले आहे. यावेळी साबाजी धुरी, सुरेश सातोस्कर, सुवर्णा देसाई, जयवंत धुरी, श्रेया तुळसकर, प्रसाद तुळसकर, सविता धुरी, सदाशिव धुरी, मन्सूरा वड्डो, अन्विता धुरी, नागेश खानगांवकर आदी उपस्थित होते.
