चुकीचे काम केल्याने गुलाब देऊन केले अभिनंदन

सेनेच्या सदस्यांचे अनोखे आंदोलन

*⚡सिंधुदुर्गनगरी ता १८-:* जिल्हा परिषदेमध्ये चुकीच्या पद्धतीने व पदाधिकार्‍यांच्या दबावाखाली काम केले जात असल्याची आठवण करून देण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा करावी. यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांच्यासह शिवसेना सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व खातेप्रमुखांना आज गुलाब पुष्प देऊन अनोखे आंदोलन केले. जिल्हा परिषद अधिनियम व शासननिर्णय न पाळणाऱ्या आणि दबावाखाली काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह सर्व खाते प्रमुखांना शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य १८ नोव्हेंबर रोजी “गुलाबपुष्प” देणार असल्याबाबतचे निवेदन सदस्य प्रदीप नारकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर याना दिले होते . त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी म्हटले आहे की, शिवसेना सदस्यांनी सुचवलेली कामे जाणीवपूर्वक घेतली जात नाहीत. वॉटर प्युरीफायर खरेदीची चौकशी अहवाल देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. विठ्ठलादेवी काडगेवाडी सौरड्यूवेल पंपासाठीचा मंजूर ४ लाख निधी काम न करताच ठेकेदाराने काढून घेतला आहे.संबंधितावरील कारवाईस विलंब होत आहे. शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करणे या कामात केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यास टाळाटाळ होत आहे. अशा विविध मुद्द्यांकडे या निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत. तर चुकीच्या पद्धतीने कारभार करुन शासन निर्णय आणि अधिनियम प्रशासनाकडून पाळले जात नाहीत. तसेच वेळोवेळी सभागृहात याबाबत लक्ष वेधले असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. यामुळे शिवसेना सदस्यांच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व खाते प्रमुखांना आज शिवसेना सदस्यानी गुलाब पुष्प देऊन अनोखे आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांच्यासह जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब ,संजय पडते, अमरसेन सावंत, स्वरूपा विखाळे, राजेश कविटकर आदि उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख यांच्या समवेत शिवसेना सदस्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात विविध वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा झाली. या मुद्द्यानुसार झालेल्या चर्चेत प्रशासनाकडून योग्य उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे आता या सर्व मुदयाबाबत कोकण आयुक्त स्तरावरून चौकशी होणार आहे. तसे आपल्याला कोकण आयुक्त यांनी सांगितले असल्याचे यावेळी सदस्य प्रदीप नारकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर ठरल्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख यांना आम्ही “गुलाब पुष्प” देऊन त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाची आठवण करून दिली आहे. आणि यापुढे प्रशासनाकडून चुकीचे काम होणार नाही अशी अपेक्षा ठेवली आहे. असे यावेळी प्रदीप नारकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page