तालुका कॉग्रेसची पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी
मालवण (प्रतिनिधी) अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेले विधान हे देशात अराजकता माजवण्यासाठी असून तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालवण पोलीस ठाण्याला देण्यात आले. कंगना राणावत हिने एका मुलाखतीत भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती एक भीक होती, असे वक्तव्य करून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा तसेच देशातील जनतेचा अपमान केला आहे. कंगना राणावत हिने केलेले विधान हा दखलपात्र गुन्हा असून तिच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती फौजदारी कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी या निवेदनात केली आहे. हे निवेदन मालवण पोलिसांना सादर करण्यात आले. यावेळी मेघनाद धुरी यांच्यासह युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, आप्पा चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.
