जिल्ह्याबाहेर जाण्याची टळली वेळ”:पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ४३८ पदवीधर शिक्षक अतिरिक्त होऊन जिल्ह्याबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झालेली असताना सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री श्री.नितेशजी राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सभेत ‘माझ्या जिल्हयातील कोणीही शिक्षक जिल्हयाबाहेर जाणार नाही’ असे आश्वासित करून सदरच्या पदवीधर शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन १ ते ५ च्या शाळेत समायोजित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. यासाठी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
शासनाने लागू केलेल्या संचमान्यतेनुसार राज्यात अनेक पदवीधर शिक्षक हे अतिरिक्त ठरले आहेत.सिंधुदुर्गात हे प्रमाण लक्षणीय असताना पदवीधर जागाच त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने अशा अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्याबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाली होती.सदर प्रश्नी पालकमंत्री नितेश राणे ,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ,माजी जि .प.अध्यक्ष सतीश सावंत,जिल्हापरिषद प्रशासन यांनी याप्रश्नी सहकार्य करीत समायोजन प्रक्रिया करताना विज्ञान /गणित पदवीधर जागांवर भाषा व समाजशास्त्र पदवीधर समायोजित करण्यास परवानगी मिळवून दिली.तसेच पदवीधर शिक्षकांतून उपशिक्षक होताना वेतन संरक्षण मिळवून दिले. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील भूमिपुत्र शिक्षक याच जिल्ह्यात स्थिरावल्याने सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.रखडलेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव बाबतही निर्णय घेण्यात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचेसह सर्वांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ,सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. विठ्ठल गवस यांनी आभार व्यक्त केले आहेत.
