Headlines

फोंडाघाटमध्ये मध्यरात्री भूकंपसदृश धक्के; चार घरांना तडे…

विद्यानगर-बेलदारवाडी परिसरातील घरांचे नुकसान:सरपंच संजना आग्रे यांची घटनास्थळी पाहणी..

⚡कणकवली ता.२४-: तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात २३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० ते ११:४५ वाजण्याच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या धक्क्यांमुळे परिसरातील चार घरांचे नुकसान झाले असून घरांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत.

या घटनेत रविंद्र सुरेश चव्हाण, दत्ताजी सुरेश चव्हाण, सोमनाथ सुरेश चव्हाण तसेच बाळू मारुती चव्हाण यांच्या घरांना तडे जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत फोंडाघाटच्या सरपंच संजना संजय आग्रे यांनी बुधवारी सकाळी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

सरपंच आग्रे यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना घटनेची माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे करून बाधित नागरिकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच परिसरातील नागरिकांनी कोणतीही अडचण अथवा समस्या असल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page