कार्यमुक्त करण्याची कंत्राटी सल्लागारांची विनंती :काम असेल तरच बसा, नाहीतर सभागृहाबाहेर जाण्याचे त्यांना आदेश..
⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ नगर पंचायतचे कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले सल्लागार नरसू बाबू रेडकर यांचे गेल्या वर्षभराचे पेमेंट नगर पंचायतीने दिलेच नसल्याची बाब आज झालेल्या कुडाळ नगर पंचायतच्या मासिक बैठकीत समोर आली. आपले पेमेंट वर्षभर मिळत नसल्याने मला थकीत पेमेंट देऊन कार्यमुक्त करावे अशी विनंती अखेर नरसू बाबू रेडकर यांना करावी लागली. ‘काम असेल तरच सभागृहात बसा नाहीतर सभागृहाबाहेर जा’, अशा सूचना सभेच्या सुरुवातीलाच नगराध्यक्ष तथा सभाध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि नगर पंचायतचे सीओ तथा सभेचे सचिव विनायक औंधकर यांनी श्री. रेडकर यांना दिल्या.
कुडाळ नगर पंचायतीची मासिक सभा आज नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायात सभागृहात झाली. सभेच्या सुरुवातीलाच नगर पंचायतचे कंत्राटी सल्लागार नरसू बाबू रेडकर यांना ‘तुम्ही सभागृहात बसू नका, तुमचा विषय आल्यावर तुम्हाला बोलावतो’, असे नगराध्यक्ष आणि सीओ यांनी श्री. रेडकर यांना सांगून सभागृहाबाहेर जायला सांगितले. त्यावर श्री. रेडकर यांनी सांगितले कि ‘मी बाहेर जातो, पण ‘एक वर्षांपासूनचे माझे पेमेंट थकीत आहे ते लवकरत लवकर द्यावे, आणि पेमेन्टला असा वेळ लागत असेल तर मला कार्यमुक्त करावे’ असे सांगितले. तसेच मला बाहेर जा म्हणून सांगण्याचा आदेश सभेचे अध्यक्ष देऊ शकतात, सचिवांना मला बाहेर जा म्हणून सांगण्याचा अधिकार नाही. त्यावर सभेचे सचिव तथा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी श्री. रेडकर यांना, ‘उगाच काही तरी सांगू नका, सचिवाला ते अधिकार आहेत’ असे सांगून श्री. रेडकर यांना ताबडतोब बाहेर जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर श्री. रेडकर यांनी पुन्हा आपल्या थकीत पेमेंटची आठवण करून देत सभागृह सोडले.
त्यानंतर श्री. रेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, गेली दोन वर्ष ते कुडाळ नगर पंचायतीमध्ये कंत्राटी सल्लागार म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत मीटिंगला बसून संबंधित विषय असल्यास आपण माहिती देत होतो. दोन वर्षांपासून आपण नगर पंचायतीला सेवा देत असलो तरी पेमेंट वेळच्यावेळी मिळत नव्हते. आतापर्यंत केवळ एकवर्षेचे पेमेंट प्राप्त आहे. एका वर्षाचे पेमेंट थकीत आहे. आपण वेळ देऊन नगरपंचायतचे काम करत आलेलो आहे. पण गेल्या वर्षभरापासूनचे आपले पेमेंट थकीत आहे. ते पेमेंट द्यावे आणि मला कार्यमुक्त करावे अशी मागणी आपण नगर पंचायतीकडे केली आहे. तसेच आपण नगर पंचायतीकडे अनामत रक्कम भरली असून कार्यमुक्त केल्याशिवाय ती रक्कम मला मिळणार नाही. त्यामुळे नगर पंचायतीने आपले थकीत पेमेंट आणि अनामात रक्कम देऊन मला कार्यमुक्त करते अशी मागणी नरसू बाबू रेडकर यांनी केली आहे.
त्याचबरोबर नगर पंचायतचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी अधिकाराबाहेर जाऊन मला सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले हे चुकीचे असल्याचे श्री. रेडकर यानी स्पष्ट केले. सभा हि अध्यक्ष बोलावतात, त्यामुळे सभागृहात कोणी बसावे की बसू नये हे ठरविण्याचा अधिकारी अध्यक्षांना असतो. सचिवाला तो अधिकार नाही असे श्री. रेडकर म्हणाले.
