मालवण (प्रतिनिधी) पथदिव्यांची वीज बिले थकीत असल्याने वीज महावितरण कंपनीने मालवण तालुक्यातील सर्वच गावांमधील पथदिवे थकबाकीच्या कारणास्तव बंद केल्याबाबत संतप्त बनलेल्या माजी सभापती व गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समिती सभेत आक्रमक पवित्रा घेतला. महावितरण कंपनी ही व्यवसाय करत असल्याने तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी महावितरण कंपनीने वीज खांब पुरले आहेत त्या जागा खासगी असल्याने या जागांचे भाडे प्रत्येक महिन्याला संबंधित जमीनमालकाला द्यावे असा ठराव सुनील घाडीगावकर यांनी सभेत मांडतानाच महावितरणने भाडे देण्याची कार्यवाही केल्यास आम्ही पथदिव्यांची बिले भरू असेही श्री. घाडीगावकर यांनी स्पष्ट केले. मालवण तालुका पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर, विनोद आळवे, कमलाकर गावडे, अशोक बागवे, मनीषा वराडकर, सोनाली कोदे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर, छाया परब यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मालवण तालुक्यातील पथदिव्यांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही बिले भरणे ग्रामपंचायतींना शक्य नाही. सद्यःस्थितीत एप्रिलपासूनची पथदिव्यांची वीज बिल हे ग्रामपंचायतींना भरावेच लागणार असल्याचे गटविकास अधिकार्यांनी स्पष्ट केले. यावर संतप्त बनलेल्या श्री. घाडीगावकर यांनी लाखो रुपयांची विज बिल ग्रामपंचायत भरणार कशी ? असा सवाल उपस्थित करत महावितरण कंपनी ही व्यवसाय करत आहे असे सांगितले. त्यामुळे या कंपनीने तालुक्यात ज्याठिकाणी वीज खांब उभारले आहेत ती जागा खासगी मालकीची आहे. संबंधित मालकांची कोणतीही परवानगी न घेता हे वीज खांब उभारण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने आतापर्यत वापरलेल्या जागेचे भाडे संबंधित जमीनमालकाला द्यावा त्यानंतर वीज बिले भरण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असा ठराव श्री. घाडीगावकर यांनी यावेळी मांडला. याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली. तालुक्यातील ओवळीये सडा जंगलवाडी येथील रस्ता खाणकामासाठी खोदून टाकण्यात आला आहे. या रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पैसे खर्च केले आहे. शासकीय मालकीच्या रस्त्याचे संबंधित व्यक्तीने नुकसान केले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने याची तत्काळ पाहणी करून संबंधिताविरोधात पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी सूचना श्री. घाडीगावकर यांनी मांडली. याठिकाणी २५० लोकवस्ती असून रस्ता खणल्याने या लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेत तत्काळ कार्यवाही करावी असे सांगण्यात आले. अलीकडच्या काही दिवसात रेवंडी-कोळंब परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने पाळीव जनावरांसह, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत वनविभागाचे लक्ष वेधले असता त्यांनी या बिबट्यांचा बंदोबस्त न करता रात्रीच्यावेळी जात केवळ फलक लावण्याचे काम केले आहे असे सांगत माजी सभापती सोनाली कोदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येथील वनविभागाच्या कर्मचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर ते कुडाळ कार्यालयाशी संपर्क साधा असे सांगतात. यावर येथील एखाद्या माणसावर बिबट्याने हल्ला केला तर कुडाळवरून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी येईपर्यत वाट बघणार का? असा प्रश्न श्री. घाडीगावकर यांनी उपस्थित केला. मालवण पंचायत समितीचा थकित सेस फंड या महिन्याच्या अखेरपर्यत जमा न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पंचायत समिती सदस्य उपोषण छेडतील असा इशाराही गटनेते श्री. घाडीगावकर यांनी यावेळी दिला.
महावितरणने खांबाच्या जागेचे भाडे द्यावे; आम्ही पथदिव्यांची बिले भरू – गटनेते सुनील घाडीगावकर
