मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी दिली माहिती
*⚡कणकवली ता.१७-:* शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात रविवारी 21 नोव्हेंबरला सकाळी 10.30 वा शोकसभा होणार आहे. या सभेत सर्व लोकप्रतिनिधी, विविध कलामंडळे आणि पुरंदरे प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संतोष सावंत,अनिल कुलकर्णी, चंद्रशेखर उपरकर ,सचिव नितीन तळेकर हे उपस्थित होते। श्री.उपरकर म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर नितांत प्रेम होते. त्यामुळेच त्यांनी जाणता राजा महानाट्याचा प्रयोग कणकवलीत केला. तसेच शिवरायांच्या जीवन कार्यावर आधारीत व्याख्यानमाला दिली. अनेक शाळा, शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमांनाही बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहिले आणि मार्गदर्शन केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठलाही कार्यक्रम असला तरी बाबासाहेब सहज उपलब्ध होत असतं एवढं प्रेम त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर केलं होतं. श्री.उपरकर म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांनी महिन्यापूर्वीच दिवाळी सणात सिंधुदुर्गात येण्याचे मान्य केले होते. मात्र घरात झालेल्या एका अपघातामुळे ते जखमी झाले आणि त्यांचा सिंधुदुर्ग दौरा अपूर्ण राहिला. लवकरच त्यांच्या अस्थि सिंधुदुर्गात आणल्या जाणार आहेत. दरम्यान बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी सिंधुदुर्गातील अनेकजण जोडले गेले होते. यासर्वांनी रविवारी २१ रोजी कणकवलीत होणाऱ्या शोकसभेला अवश्य उपस्थित राहावे. असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान निधनानंतर आपल्या अस्थी कुठल्या तरी किल्ल्यावर विशेषत: सिंधुदुर्ग किल्ल्यावर विसर्जित व्हाव्यात अशी अपेक्षा बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या कुटुंबियांकडे व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या अस्थी सिंधुदुर्ग किल्ल्यावर विसर्जित होणार आहेत. त्याचा कार्यक्रमही नंतर ठरवला जाणार असल्याची माहिती मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दिली.
