अडीज तासच चालली सभा नियमात राहून सभेचे कामकाज
ओरोस-:जिल्हा नियोजन सभा किरकोळ वाद वगळता खेळीमेळीत संपन्न झाली. विरोधकांचा इशारा व त्यावर पालकमंत्री यांचे सूचक वक्तव्य यामुळे या सभेकडे लक्ष राहून राहिले असताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमुळे अभूतपूर्व शांततेत पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच जिल्हा नियोजन नियमानुसार सभा घेण्याचे सभागृहात एकमत झाल्याने वादळी ठरणारे वायफळ विषय चर्चेत आले नाही. तर मंत्री राणे यांनी आपल्या सदस्यांना खाली बसविल्याने तसेच पालकमंत्री सामंत व आ दीपक केसरकर नियमात सभा घेण्यास आग्रही राहिल्याने कोणतेही मोठे वादंग न होता सभा संपन्न झाली. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, खा विनायक राऊत, आ दीपक केसरकर, आ नितेश राणे, आ वैभव नाईक, आ बाळाराम पाटील, आ अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह जिल्हा नियोजन सदस्य, अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाची २०२१-२२ या आर्थिक वर्षातील पहिली सभा आज संपन्न झाली. या सभेला सत्ताधारी व विरोधक यांच्यात अभूतपूर्व एकमत झाले ते म्हणजे केवळ जिल्हा नियोजन अंतर्गत येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्याचे. सभेच्या सुरुवातीलाच हा निर्णय झाल्याने ५२२ पानांची सभेच्या इतिवृत्ताची पुस्तिका असताना केवळ २३ विषयांवर चर्चा झाली. ती सुद्धा विषय नुसार न होता सदस्याला आक्षेप असल्यास बोलण्यास सांगण्यात आले होते. तसेच त्यानंतर आयत्या वेळेच्या विषयात कोणाला बोलायचे असल्यास दोन मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. जिल्हा नियोजन बाहेरील विषय असल्यास लेखी देण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दिवसभर चालेल अशी वाटत असताना केवळ अडीज तासात सभा आटोपली.
