प्रा मधु दंडवते यांचा स्मृतिदिन सेवांगणने केला साजरा

कट्टा येथील कार्यक्रमांत संपादक श्रीकृष्ण हरचांदे होते उपस्थित

मालवण दि प्रतिनिधी कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते. यांचा सोळावा स्मृतिदिन बॅ. नाथ पै 4 सेवांगण कट्टा येथे माता यशोदा आरोग्य अंकाचे संपादक श्रीकृष्ण हरचांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण हरचांदे यांनी १९७७ च्या ऐतिहासिक निवडणुकीतील जयप्रकाश नारायण यांच्या सोबतची आठवण सांगितली. प्रा. दंडवते यांच्यासारखे निस्पृह व्यक्तित्व सर्वानाच आदर्शवत आहे. त्यांच्या विचाराने चालणाऱ्या सेवांगणास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सेवांगणच्या कट्टा शाखेचे अध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. बॅ नाथ पै यांच्या निधनानंतर प्रा. मधु दंडवते यांची उमेदवारी जाहीर होण्यापर्यंतचा घटनाक्रम विषद केला. सेवांगणच्या कार्यकारिणीचे सदस्य नितीन वाळके यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या सोबत घालवलेल्या अनेक सुवर्णक्षणांची आठवण जागृत केली. उच्च पदावर काम करूनही सामान्य कार्यकर्त्यांसोबत सामान्य जनतेसोबत मित्रत्वाच्या नात्याने वागणारे मधु दंडवते आमच्यासाठी सर्वस्व आहेत याचा उल्लेख केला. दीपक भोगटे यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाची माहिती दिली. सेवांगणचे कार्य हे प्रा. मधु दंडवते यांच्या विचाराप्रमाणेच चालू आहे व सुरु राहील याची ग्वाही दिली. यावेळी आकाशकंदील व भेटकार्ड प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीकृष्ण हरचांदे यांचे हस्ते करण्यात आले. दिवाळीनिमित्त घेतलेल्या आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धेतील विजेत्यांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शिवणविभागाच्या महिलांसाठी घेतलेल्या ९ विविध स्पर्धांचेसुध्दा बक्षीस वितरण भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आले. यावेळी होतकरु विद्यार्थ्यांसाठी असलेला मधु दंडवते सेवानिधी १० विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला. यावेळी किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, नितीन बाळके, शाम पावसकर, सुजाता पावसकर, अनिल चव्हाण, कुडतरकर, रवींद्र नाईक विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page