भाजपची राज्य सरकारकडे मागणी;अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
*⚡सावंतवाडी ता.११-:* केंद्र सरकारने पेट्रोल वर ७ रुपये तर डिझेलवर १० रुपये कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. परंतु, महा विकास आघाडी सरकारने कोणत्याही प्रकारे या इंधनाच्या दरात कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला नाही. याचा निषेध आज भाजप सावंतवाडी शहर मंडल कडून व्यक्त करण्यात आला असून, राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कपात न केल्यास राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्य सरकारला सावंतवाडीचे प्रांताधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशातील पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक ओढाताण होत होती. याची दखल घेऊन केंद्र सरकारने पेट्रोल ७/- रू. तर डिझेल १०/- रू. कमी केले होते. तसेच भाजप प्रणित राज्य सरकारने देखील या निर्णयाची दखल घेऊन प्रत्येकी ७ रुपये कमी केले. परंतु, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही प्रकारे पेट्रोल, डिझेल च्या दरात कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला नसून, केवळ केंद्र सरकार विरोधात आंदोलन केली आहेत. याचा निषेध भाजपने व्यक्त केला असून, कर कपात न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे,नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित शेखर गावकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
