आता भाजपा सरपंच करणार राज्य सरकार विरोधात आंदोलन

स्ट्रीट लाईट बिल, ग्रामीण घर बांधणी परवानगी, रस्त्याची दुरावस्था हे आहेत विषय;१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार लाक्षणिक उपोषण

ओरोस-:केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामीण आवास योजने विरोधात शिवसेनेच्या सरपंच संघटनेने आंदोलन छेडल्यानंतर जिल्ह्यातील भाजपाची सरपंच संघटना राज्य शासनाच्या विरोधात आक्रमक बनली आहे. ग्रामीण भागातील घर परवानगी व स्ट्रीट लाईट बील हे दोन विषय घेऊन १६ नोव्हेंबर रोजी भाजपाचे सरपंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडणार आहेत. शिवसेनेच्या कुडाळ सरपंच संघटनेने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले होते. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या ड यादीत हजारो लाभार्थ्याना डावलले असल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांचा समावेश करावा, या मागणीसाठी आंदोलन छेडले होते. आता भाजप सरपंच सुद्धा राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणा विरोधात आवाज उठविणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आले आहे. देण्यात आलेल्या निवेदनात ग्राम पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी पथदिवे बसविले आहेत. याची येणारी विद्युत बिले राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग भरत होता. परंतु एप्रिल २०१९ नंतरची बिले भरण्यास शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे ही वीज बिले थकली होती. त्यामुळे वीज वितरण कंपनीने सप्टेंबर पासून पथदिवे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे ऐन गणेश चतुर्थी व दिवाळी कालावधीत दिवाबत्ती बंद होती. ग्रामीण घर बांधणी परवानगीचे अधिकार पूर्वी ग्राम पंचायतीकडे होते. २०१६ पासून हे अधिकार महसूल विभागाकडे देण्यात आले. याबाबत पुन्हा आदेश काढत ग्राम पंचायतीला प्राधिकरण म्हणून नियुक्त करीत प्रचलित नियमानुसार घर परवानगी देण्याचे अधिकार दिले. परंतु परवानगीसाठी आवश्यक कागद क्लिष्ट असल्याने जिल्ह्यातील हजारो ग्रामीण घरांच्या परवानग्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्ते खराब झालेले असताना जिल्हा नियोजन कडून निधी दिला जात नाही. दिलेला निधी समप्रमाणात नाही, असे नमूद केले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ रोजी सकाळी १० पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. तसेच ३० नोव्हेंबर पूर्वी यावर ठोस उपाययोजना केली गेली नाहीतर याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या निवेदनावर पणदूर सरपंच तुकाराम साईल, रुपेश कानडे, नागेश परब, प्रशांत बोडेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page