घावनळे गाव सेनेचा बालेकिल्ला करण्याचा निर्धार
*⚡कुडाळ ता.०९-:* आबा मुंज यांच्यानंतर घावनळे गावाला कोणी वाली उरला नाही. म्हणून घावनाळे गावाच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य समोर ठेवून मी शिवसेनेत प्रवेश करीत आहे. आतापर्यंत घावनळे गाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. यापुढे हा गाव शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांनी केले. शिवसेना पक्षाचा कुडाळ तालुक्याचा मेळावा घावनळे बामणादेवी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रवेश केला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उपसभापती जयभारत पालव, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, अनुप्रिती खोचरे, राजू कविटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, बबन शिंदे, पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, प्रभाकर वारंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, कृष्णा धुरी, योगेश घावनळकर, राजू शेट्ये आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रवेशकर्ते उपसरपंच दिनेश वारंग यांनी सांगितले की, घावनळे गावांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. आबा मुंज असताना आम्हाला कोणत्याही नेत्याकडे जाण्याची आणि बघण्याची गरज नव्हती आमची कामे होत होती मात्र त्यांचे निधन झाल्यावर आम्हा कार्यकर्त्यांना आधाराची गरज होती गावाच्या विकासाची गरज होती त्यामुळे आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहोत काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कधीही आम्हाला विचारले गेले नाही असे सांगून गावामध्ये असलेली विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून होऊ शकतात असा आमचा विश्वास आहे त्यामुळे आतापर्यंत हा गाव काँग्रेसचा बालेकिल्ला होता आता हा यापुढे हा गाव शिवसेनेचा बालेकिल्ला होणार आहे असे त्यांनी सांगितले. *विकास निधी कमी पडू देणार नाही- आमदार वैभव नाईक* यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की या गावासाठी आवश्यक असलेला विकास निधी हा शिवसेनेच्या माध्यमातून दिला जाईल. यात कोणतीही शंका बाळगू नये. गावातील रस्ते तसेच घावनळे निवजे पुल हेसुद्धा केले जाईल. या गावाला विकास निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
