एस.टी. कर्मचाऱ्यांसह वर्कशॉपमधील कर्मचारीही सामील;वाहतूक ठप्प
*⚡कणकवली ता.०९-:* महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे जिल्ह्यातील एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांसह वर्कशॉपमधील कर्मचारीही या संपात सहभागी झाले होते.त्यामुळे एस.टी.सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे एसटी सेवा बंद असल्यामुळे कामावर जाणाऱ्या कर्मचारी तसेच दिवाळी निमित्त जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. काल कणकवली एसटी डेपो पूर्णतः कर्मचारी संघटनांनी बंद केल्यानंतर आज एस. टी .विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी संपात सहभागी झाले. विभागीय कार्यालयाच्या गेटवर कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत विलीनीकरणासाठी घोषणाबाजीही केली. तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला. दिवाळी सुरु होण्यापूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पेटलेली ठिणगी अद्याप शांत झालेली नाही. संपामध्ये सिंधुदुर्ग विभागातील कर्मचारीही सोमवारपासून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली होती. महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे.. त्यामुळे या मागणीसाठी गेले तेरा दिवस राज्यभरात ठिकठिकाणी काम बंद सुरू करण्यात आले होते. सिंधुदुर्ग विभाग मात्र यात सहभागी झालेला नव्हता. परंतु सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने एसटी महामंडळाची संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली.सिंधुदुर्ग विभागामध्ये सोमवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णत कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सिंधुदुर्गातही एसटी कर्मचाऱ्यांनी संपात उडी घेत चक्काजाम आंदोलन हाती घेतले आहे.सर्वच आगारांमधून एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांचे बेहाल झाले आहेत. राज्यातील सर्वच आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची घोषणा केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र करण्यात आल्याने दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या प्रवाशांना परतीच्या मार्गात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
