Headlines

अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडणार…

बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांचा इशारा…

सावंतवाडी ता.०३-:दिवाळी सारख्या सणाच्या काळात चालू असलेली वीज तोडणीची कारवाई तात्काळ न थांबविल्यास राज्य सरकारच्या विरोधात तीव्र जन आंदोलन छेडू असा इशारा बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला असून, त्या बाबतचे निवेदन त्यानी राज्यपालांना पाठवले आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे हवालदिल झालेल्या जनतेकडून थकीत वीज बिल प्रकरणी सरकारने वीजधारकांची वीज कनेक्शने तोडण्यास सुरुवात केलेली आहेत. ऐन दिवाळीच्या काळात या गरीबांच्या घरात अंधार दाटला असून, या प्रकरणी सरकार काहीही बोलत नाही. सरकारने किमान सणासुदीच्या काळात वीज तोडणी करुन गरीबांच्या आनंदावर विरजण घालू नये. हा प्रकार त्वरीत न थांबवल्यास बहुजन मुक्ती पार्टी राज्यभरात तीव्र आंदोलन छेडणार आहे. महाराष्ट्रमध्ये अनेक सरकार सत्तेवर येत असताना वीज बील माफीचा तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन सत्तेवर येतात. परंतु सत्तेवर आल्यावर वीज बिलासंदर्भात, मोफत वीजे संदर्भात काहीही बोलत नाहीत. उलट महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या सरकारने सामान्य वीज ग्राहकांची, शेतक-यांची, व्यापा-यांची मोठ्या प्रमाणात वीज शुल्क आकारुन लूट चालविली आहे. अशातच दिपावलीच्या सणात वीज कनेक्शन तोडणी मोठ्या प्रमाणावर सुरु केली आहे. त्यामुळे जनसामान्यांची दिवाळी अंधारातच होणार का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी किमान सणासुदीच्या काळात तरी सरकारने वीज कनेक्शन कापून जनतेचा अंत पाहू नये. सरकारने किमान सणासुदीच्या काळात वीज तोडणी करुन गरीबांच्या आनंदावर विरजण घालू नये. अशी मागणी केली आहे. यावेळी येत्या १० नोव्हेंबरला लाईट बिल जलाओ आंदोलन, २० नोव्हेंबरला जेलभरो आंदोलन तर ७ डिसेंबरला ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या घराला घेराव घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page